जळगावच्या तरुणाचा मनुदेवी येथे बुडून मृत्यू

budun mrutyu

जळगाव, प्रतिनिधी | मित्रांसोबत मनुदेवी येथे दर्शनासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना आज (दि.६) दुपारी २.०० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पीपल्स बँकेसमोरील, दत्त मंदिराजवळील, तुकाराम वाडीतील रहिवासी अशोक गोपाल सोनवणे (वय ३२) हे गेल्या सात वर्षांपासून (स्वयंपाक) केटरिंगचे काम करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आपल्यासोबत काम करणाऱ्या १२ ते १५ मित्रांसह ते आज सकाळी ११.३० च्या सुमारास दुचाकीने मनुदेवी येथे दर्शनासाठी गेले होते. मनुदेवी येथे दुपारी २.०० वाजता पोहोचल्यानंतर आंघोळीसाठी अशोक सोनवणे नदीत उतरले, त्यात पाय घसरल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. ते बुडत असल्याचे पाहून मित्रांनी तातडीने त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र नदीमधील पाईपात पाय अडकल्याने नाका आणि तोंडात पाणी जाऊन त्यांचा मृत्यू झाला. मित्रांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. कळसकर यांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी, बहीण आणि दोन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. याबाबत शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content