जळगाव-जितेंद्र कोतवाल : स्पेशल रिपोर्ट | राष्ट्रवादीचे माजी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी चक्क जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांना समाजमाध्यमातून शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यामुळे ते वेगळ्या वाटेवरून तर जाणार नाहीत ना ? असे विचारले जात आहे.
काही महिन्यांपूर्वी जळगाव महानगर राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी होऊन तत्कालीन महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर एकनाथ खडसे यांचे समर्थक अशोक लाडवंजारी यांची या पदावर वर्णी लागली होती. यानंतर अभिषेक पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यक्रमांकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे. अगदी वरिष्ठ नेत्यांच्या दौर्यातही ते कुठे दिसून आले नाहीत. त्यांच्या मातोश्री कल्पना पाटील यांच्याकडे ग्रंथालय सेलचे वरिष्ठ पद होते. मात्र त्यांनीही पदत्याग केल्यानंतर जळगावातील कार्यक्रम अटेंड केले नाहीत. मध्यंतरी त्यांनी स्वतंत्रपणे वरिष्ठांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियात शेअर केले होते. हा अपवाद वगळता त्या देखील राष्ट्रवादीत सक्रीय नाहीत.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमिवर, अभिषेक पाटील यांनी नवनिर्वाचीत मंत्री ना. गिरीश महाजन आणि ना. गुलाबराव पाटील या दोन्ही मंत्र्यांना शुभेच्छा देणारे पोस्टर सोशल मीडियात शेअर केले आहे. राजकीय नेते हे फार तर वाढदिवसाला एकमेकांना शुभेच्छा देतात. मात्र आपल्या पक्षाचे कट्टर राजकीय विरोधक असणार्या दोन्ही मंत्र्यांना अभिषेक पाटील यांनी शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. यातून ते वेगळी वाट तर चोखाळणार नव्हेत ना ? असेही आता बोलले जात आहे.
अभिषेक पाटील यांनी गत विधानसभा निवडणूक जळगाव मतदारसंघातून लढविली होती. यात त्यांनी पन्नास हजारांच्या उंबरठ्यावर मते घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. एक अतिशय प्रॉमिसींग नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. पक्षाने त्यांना महानगराध्यक्ष करून पाठबळ देखील दिले होते. नंतर मात्र, अंतर्गत लाथाळ्यांमुळे त्यांच्या वाटचालीत अडचणी आल्या. यानंतर पदाचा राजीनामा देऊन ते स्वस्थ बसले. यानंतर आता त्यांनी थेट दोन्ही मंत्र्यांना जाहीर शुभेच्छा दिल्याने राजकीय वर्तुळात कुजबुज सुरू झालीय हे मात्र नक्की.
दरम्यान, या संदर्भात अभिषेक पाटील यांचे मत जाणून घेण्यासाठी संवाद साधला असता ते म्हणाले की, मंत्रीपद हे कोणत्याही राजकीय पक्षाचे नसते. जनतेची कामे करण्याचे काम मंत्र्यांच्या माध्यमातून होत असते. आणि जिल्ह्यास दोन महत्वाची मंत्रीपदे मिळणार असून यातून कामे मार्गी लागणार असतील तर शुभेच्छा देण्यता गैर काय ? असे ते म्हणाले. तर राष्ट्रवादी पक्षातील आपली वाटचाल काही वेगळी असेल का ? याला त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.