जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी हे गुन्हा दाखल झाल्यानंतर रात्रीच अज्ञातस्थळी रवाना झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याचे वृत्त आहे.
सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या महाप्रबोधन यात्रेमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. यामुळे शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड तणाव वाढीस लागला आहे. यात भर पडली ती युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांच्या वादग्रस्त भाषणाची !
शरद कोळी यांनी धरणगाव येथील सभेत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, गुजर समाज आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या नेत्यांवर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्यामुळे त्यांच्यासह सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वीच शरद कोळी यांच्या भाषणावर देखील बंदी लादण्यात आली आहे. यातच शरद कोळी यांना चोपडा येथील सभेत जाण्यापूर्वी स्थानबध्द करण्यात येईल अशी चर्चा सुरू होती. तथापि, ते पोलिसांना चकमा देऊन गायब झाल्याने खळबळ उडाली आहे.
जळगाव शहर पोलीस स्टेशनमधून बाहेर पडतांना शरद कोळी हे महापौर जयश्रीताई महाजन यांच्या वाहनात होते. मात्र ते चोपड्याला पोहचलेच नाही. ते रस्त्यातून अज्ञात स्थळी रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. तर आज दिवसभरात शरद कोळी यांच्या विरूध्द आणि समर्थनार्थ दोन्ही गट आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता देखील आहे.