जळगाव प्रतिनिधी | उपप्रादेशीक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओ ऑफिसमध्ये आज सकाळपासून बाहेरून आलेल्या पथकाने कसून तपासणी सुरू केली असून ही चेकींग नियमित कामकाजाचा भाग असल्याची माहिती देण्यात आली असली तरी अचानक झालेल्या या कारवाईने काही काळ खळबळ उडाली.
या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, आज सकाळी साडेदहाच्या सुमारास अचानक बाहेरून आलेल्या पथकाने आरटीओ ऑफिसचा ताबा घेऊन तपासणी सुरू केली. याप्रसंगी बाहेरून आलेल्यांना प्रवेश दिला जात नसून फक्त कार्यालयीन कर्मचारी आणि अधिकारीच ऑफिसमध्ये आहेत. तर पथकाने कार्यालयातील कागदपत्रांची कसून तपासणी सुरू केली आहे. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रतिनिधीने कार्यालयात संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
यानंतर प्रस्तुत प्रतिनिधीने कार्यालयात जाऊन चौकशी केली असता वरिष्ठ लिपीक श्री इंगळे यांनी आज व्हिजीलन्सच्या पथकाने केलेली चौकशी ही नियमीत कामकाजाचा भाग असल्याचे सांगितले. दुपारपर्यंत नेमकी कशाची तपासणी करण्यात आली याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.