जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात इरास्मस प्लस प्रकल्पांतर्गत क्षमता विकसन केंद्र सुरु झाले असून या केंद्राचे उद्घाटन गुरुवारी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
युरोपियन युनियनच्या इरास्मस प्लस योजनेअंतर्गत भारतीय उच्च शिक्षणातील शिक्षकांच्या गुणवत्तेचा स्तर वाढविण्यासाठी क्षमता विकसन केंद्र स्थापन करण्यासाठी पोलंड, पोर्तुगाल, सायप्रस, स्लोव्हाकिया व बेल्जीयम या देशातील प्रत्येकी एक आणि कबचौ उमविसह भारतातील पाच अशा दहा विद्यापीठांना 3 वर्षांसाठी 7 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. विद्यापीठाने याबाबतीत सामंजस्य करार केला असून विद्यापीठ कॅम्पसवरील विविध प्रशांळांच्या शिक्षकांना यापूर्वी तीनवेळा प्रशिक्षण देण्यात आले आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात या संदर्भातील क्षमता विकसन केंद्र गुरुवार पासून सुरु झाले. शिक्षणशास्त्र विभागाच्या नवीन इमारतीत अत्यंत सुसज्ज व अत्याधुनिक उपकरणांसह सुरु झालेल्या या केंद्राचे उद्घाटन कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कॅबसिन प्रकल्प व्यवस्थापक पोलंड येथील डॉ.कामिला लूडविकोवस्का, प्राचार्य अनिल राव, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील या कॅबसिन प्रकल्पाचे विद्यापीठ समन्वयक प्रा.ए.एम.महाजन, प्र.वित्त व लेखा अधिकारी सोमनाथ गोहिल उपस्थित होते.
या उदघाटनानंतर सिनेट सभागृहात झालेल्या कार्यशाळेत बोलतांना डॉ.कामिला लूडविकोवस्का यांनी सविस्तरपणे कॅबसिन प्रकल्पाविषयी माहिती दिली. युरोप आणि भारतातील उच्च शिक्षणातील चांगल्या कल्पनांची देवाण घेवाण, शिक्षणातील अद्ययावत पध्दतीवर चर्चा करणे, शिक्षकांना प्रशिक्षण देणे त्यांच्यातील क्षमतांचे विकसन करणे, शिक्षणात तंत्रज्ञानाचा अधिक वापर करणे हे या प्रकल्पात अपेक्षित असून त्या पध्दतीचे प्रशिक्षणाचे काही टप्पे पूर्ण झाल्याचे डॉ.कामिला यांनी सांगितले. प्राचार्य अनिल राव यांनी आपल्या भाषणात प्रत्येक विद्याथ्र्यांमध्ये कोणत्या न कोणत्या क्षमता असतात त्या क्षमता शिक्षकांनी ओळखाव्यात व त्या बाबतीतील एखादे मोडयुल विकसित करावे असे आवाहन केले. अलिकडे शिक्षणाची पध्दत बदलत असून विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद होणे गरजेचे आहे. माहितीच्या पलीकडे जाऊन विद्याथ्र्यांना शिक्षकांनी ज्ञान देणे गरजेचे आहे. विद्यार्थी आता बहुसांस्कृतिक झाला आहे. त्यामुळे हा बहुसांस्कृतिक दृष्टिकोन शिक्षक आणि विद्याथ्र्यांमध्ये येणे गरजेचे असल्याचे श्री.राव म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी शिक्षकांमध्ये व्यावसायिक कौशल्य येणे गरजेचे असून या केंद्रामार्फत ते कौशल्य निश्चितच अधिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आणले जातील अशी अपेक्षा व्यक्त करुन या केंद्राला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्र-कुलगरु प्रा. पी.पी. माहुलीकर यांनी उच्चशिक्षणातील गुणवत्ता वाढीत विद्यापीठातील हे केंद्र महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे सांगून रुसा मार्फत या केंद्रात दिल्याजाणाज्या सुविधांची माहिती दिली. समन्वयक प्रा.ए.एम.महाजन यांनी प्रास्ताविकात या प्रकल्पाची व गेल्या दिड वर्षात प्रकल्पांतर्गत राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. गुणवत्ता वाढीसाठी हे केंद्र ऐतिहासिक ठरेल असा विश्वास प्रा.महाजन यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.भूषण चौधरी यांनी केली. डॉ.रमेश सरदार यांनी आभार मानले. या प्रकल्पात प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.