जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील आणि पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी व भूसंपादन अधिकारी किरण सावंत-पाटील यांच्या बदल्या झाल्या असून याबाबतचे शासकीय आदेश देखील निर्गमीत करण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या महसूल व वन खात्याने उपजिल्हाधिकारी संवर्गातील १४ अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन अधिकार्यांचा समावेश आहे. जिल्ह्याचे निवासी उप जिल्हाधिकारी राहूल पाटील यांची बदली अहमदनगर येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी या पदावर झालेली आहे. तर, त्यांच्या जागी अद्याप कुणाची बदली झालेली नाही.
यासोबत जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांची बदली झाली असून त्यांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. तर, त्यांच्या जागी धुळे येथील निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड हे बदली होऊन रूजू होणार आहेत. तसेच जिल्हा भू-संपादन अधिकारी किरण सावंत-पाटील यांची श्रीरामपूर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी नगर येथील पुरवठा अधिकारी पदावर कार्यरत श्रीमती जयश्री माळी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या तिन्ही अधिकार्यांच्या बदल्यांचे शासकीय आदेश हे निर्गमीत करण्यात आलेले आहेत. यात पुरवठा अधिकारी आणि भू-संपादन अधिकारी हे लवकरच पदभार स्वीकारण्याची शक्यता असून निवासी उपजिल्हाधिकारी पदावर देखील लवकरच नियुक्ती होईल अशी अपेक्षा आहे.