जळगाव jalgaon प्रतिनिधी । जळगाव शहरात जिल्हाधिकार्यांनी १२ ते १४ मार्च दरम्यान तीन दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या तीन दिवसांमध्ये नेमके काय सुरू राहणार ? आणि काय बंद राहणार ? याबाबत जळगावकरांच्या मनात संभ्रम आहे. या पार्श्वभूमिवर, खास आपल्यासाठी आम्ही याबाबतचे सविस्तर विवरण सादर करत आहोत. Jalgaon Janta Curfew
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जळगाव शहरात तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याची घोषणा केली. जळगाव शहराच्या हद्दीत ११ मार्च रोजी रात्री आठ वाजेपासून जनता कर्फ्यू सुरू होणार असून तो १५ मार्च २०२१ रोजी सकाळी आठ वाजता संपणार आहे. या दरम्यान, आपत्कालीन सेवा वगळता अन्य सेवा बंद राहणार आहेत.
हे असेल बंद
जनता कर्फ्यूमध्ये सर्व शाळा, कॉलेज आदी शैक्षणिक संस्था, बाजार, भाजीपाला दुकाने, सलून, सर्व खासगी कार्यालये, धार्मिक स्थळे, सार्वजनीक कार्यक्रम, किराणा दुकाने, नॉन-इसेन्शीयल या प्रकारातील सर्व दुकाने, दारू दुकाने, बगीचा/उद्याने, पानटपरी, हातगाड्या, सिनेमागृहे, व्यायामशाळा/जीम, तरणतलाव आदी सर्व बाबी बंद राहणार आहेत.
हे असेल सुरू
तर, जनता कर्फ्यूमध्ये वैद्यकीय आपत्कालीन सेवा, जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक, बस, रेल्वे व विमानसेवा; नियोजीत परीक्षा असणारी शाळा व कॉलेजेस, बँका व वित्तीय संस्था, कृषी केंद्र, गॅरेज, वर्कशॉप्स, कुरीयर, सर्व प्रकारची माल वाहतूक, कोविड लसीकरण, अत्यावश्यक सेवेच्या वाहनांसाठी पेट्रोल व डिझेल मिळणार आहे. तर शासकीय कार्यालयांमध्ये निम्मे उपस्थिती असावी असे या निर्देशांमध्ये सूचित करण्यात आले आहे. ज्यांना जनता कर्फ्यूमधून सुट दिलेली आहे त्यांनी आपापल्या आस्थापना वा सेवांची ओळखपत्रे सोबत बाळगावीत असेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. दिनांक १४ मार्च रोजी एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची होणारी परीक्षा ही विहीत वेळापत्रकानुसारच होणार असून विद्यार्थ्यांनी सोबत ओळखपत्र ठेवावे असे जिल्हा प्रशासनाने नमूद केले आहे.