जळगाव प्रतिनिधी | पिस्तुलाची धमकी दाखवून हॉटेलमध्ये दारू पिऊन धुमाकूळ घालणार्या तिघांना एलसीबीच्या पथकाने अटक केली असून यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. यातील एक स्वयंंघोषीत डॉन असल्याचे चौकशीतून समोर आले आहे.
संदीप उर्फ डॉन मधुकर निकम व अंकुश मधुकर सुरवाडे (दोघे रा. गेंदालाल मिल) व एक अल्पवयीन मुलगा या तिघांनी मू. जे. महाविद्यालय परिसरातील चाय सुट्टा बार या हॉटेलात धुमाकूळ घातला. दुपारी ते तिघे दुकानात गेेले. यातील एकाने कमरेला खोचलेले पिस्तूल मॅनेजर ओम गुरुदास शामनानी (रा. गणपतीनगर) आणि विवेक संजय महाजन यांना दाखवून धमकावले. त्यानंतर तिघांनी वरच्या मजल्यावर जाऊन तेथे बसलेल्या तरुण-तरुणींनादेखील पिस्तूलचा धाक दाखवून बाहेर काढले. यानंतर वरच्या मजल्यावर तिघे दारू प्याये. काही वेळानंतर ते हॉटेलातून निघून गेले.
दरम्यान, या शामनानी यांनी रामानंदनगर पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी घटनास्थळी येऊन सीसीटीव्ही कॅमेर्याच्या फुटेजची तपासणी केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रीतम पाटील, राहुल पाटील, राजेंद्र पवार यांनी फुटेज ताब्यात घेऊन यातील दोघांना रात्री ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.