गणेश विसर्जनासाठी आणलेल्या ओमनीने घेतला पेट !

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गणेश विसर्जनासाठी आलेल्या दाम्पत्याच्या ओमनी मॉडेलच्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना आज घडली.

भुसावळ येथील तापी नदीच्या पात्रात आज सकाळपासूनच गणेश विसर्जनाची धामधूम सुरू आहे. या अनुषंगाने जुना सातारा भागातील गोपाळ भंगाळे हे आपल्या कुटुंबासह भगवान परशुराम मंदिराचे बाजूने गणेश विसर्जनासाठी ओमनी कारमधून आले होते. त्यांनी नदीपात्रात गणेश मूर्तीचे विसर्जन केले. यानंतर बाहेर उभ्या असलेल्या गॅसवर चालणार्‍या ओमनी गाडीला सेल देताच या गाडीतील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यानंतर क्षणार्धात कारने पेट घेतला.

या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. तात्काळ लोकांनी धाव घेऊन आग विझवली. दरम्यान, या अपघातात गोपाळ भंगाळे हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या गाडीत कोणीही नसल्याने जीवित हानी टळली आहे. गाडीच्या काचा बंद असल्यामुळे व बाहेरून देखील ऊन असल्यामुळे हा स्फोट झाला असावा असा अंदाज आहे.

Protected Content