
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनात जळगावच्या विद्यार्थिनींनी आपल्या कलागुणांची प्रभावी छाप पाडत उपस्थितांचे मन जिंकले. अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या कातकरी नृत्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली असून त्यांच्या सादरीकरणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे नाशिक येथे चौथे विश्व मराठी संमेलन मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले होते. जगभरातील मराठी भाषिकांना एकत्र आणणाऱ्या या संमेलनात तब्बल १९ देशांमधून मराठीप्रेमी सहभागी झाले होते. तीन दिवस चाललेल्या या भव्य संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी बालरंगभूमी परिषदेतर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात जळगावच्या अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थिनींनी बहारदार कातकरी नृत्य सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापिका रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे यांनी विद्यार्थिनींना प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींनी उत्कृष्ट नृत्य सादर करत नाशिक येथे भरलेल्या या जागतिक स्तरावरील संमेलनात जळगावचा झेंडा अभिमानाने फडकावला. या कलावंतांना बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के सामंत आणि प्रभारी प्रमुख कार्यवाह योगेश शुक्ल यांच्या प्रयत्नातून संधी उपलब्ध झाली होती. या संधीचे सोने करत विद्यार्थिनींनी जोशपूर्ण आणि तालबद्ध नृत्य सादर केले.
कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थिनी डिंपल चौधरी, भूमिका चौधरी, रेणुका पवार, पूर्वी भावसार, चिन्मयी जंजाळकर, स्वरा महाजन, सुंदरम चिमकर, विद्या सपकाळे, चेतन धनगर, हर्षिता निकुंभ तसेच वादक मोहित सोनवणे, ललित पवार, वेदांत जडे, रोहन चव्हाण आणि सचिन महाजन यांच्यासह संघप्रमुख ज्ञानेश्वर सोनवणे यांचा प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन आणि संचालिका निशा अनिल जैन यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करत त्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे जळगावच्या सांस्कृतिक परंपरेला जागतिक व्यासपीठावर सन्मान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या संमेलनात विद्यार्थिनींच्या दमदार सादरीकरणामुळे जळगावचे नाव उज्ज्वल झाले असून त्यांच्या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.



