
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळी हंगामात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) जळगाव विभागाने विक्रमी उत्पन्न मिळवत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पुणे विभागाने पहिला क्रमांक मिळवला असताना, जळगाव विभागाने १५.६० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवत अनेक मोठ्या विभागांना मागे टाकले आहे. ही माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी प्रसारित केलेल्या निवेदनाद्वारे दिली.

एसटी महामंडळाच्या आकडेवारीनुसार, १८ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर या दिवाळी हंगामात सर्व विभागांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या आणि त्यांच्या योग्य नियोजनामुळे महसुलात लक्षणीय वाढ झाली. पुणे विभागाने २०.४१ कोटी रुपयांचे सर्वाधिक उत्पन्न मिळवून अव्वल स्थान पटकावले, तर जळगाव विभागाने १५.६० कोटींच्या कमाईसह राज्यात दुसरे स्थान मिळवले. नाशिक विभाग १५.४१ कोटी रुपयांसह तिसऱ्या स्थानी राहिला.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी पुणे, जळगाव आणि नाशिक या तिन्ही विभागांचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की, “एसटी विभागातील कर्मचाऱ्यांनी दिवाळीत घरापासून दूर राहून प्रवाशांना सुरक्षित आणि सुटसुटीत प्रवासाची सेवा दिली. ही कामगिरी त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचे प्रतिक आहे.”
दुसरीकडे, काही विभागांनी अपेक्षित कामगिरी न केल्याने चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली आणि धाराशिव या विभागांची कामगिरी समाधानकारक नसल्याचे सरनाईक यांनी नमूद केले. या विभागांनी आर्थिक नियोजन आणि प्रवासी सेवा यामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
जळगाव विभागाने मिळवलेल्या या यशाबद्दल विभाग नियंत्रक दिलीप बंजारा यांनी आनंद व्यक्त केला. “ही कामगिरी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचे फलित आहे. प्रत्येक चालक, वाहक आणि अधिकारी यांनी दिवाळीतही मेहनत घेऊन विभागाचा गौरव वाढवला,” असे ते म्हणाले.
संयुक्त कृती समितीचे संयोजक गोपाळ बी. पाटील यांनीही जळगाव विभागाच्या संघभावनेचे कौतुक केले. ते म्हणाले, “जळगाव विभागातील सकारात्मक वातावरण, संघटित नियोजन आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांची समन्वयित मेहनत यामुळेच उत्पन्नात वाढ झाली आहे. हा यशाचा क्षण सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.”



