जळगाव प्रतिनिधी । महापौर निवडणूक तोंडावर आली असतांना सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांनी बंडाचा झेंडा हाती घेत शिवसेनेशी संधान साधल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यामुळे महापालिकेत सत्तांतर होण्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे.
महापौर व उपमहापौरपदाची निवड १८ मार्च रोजी होणार आहे. या आधीच सत्ताधारी भारतीय जनता पक्षात अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात समोर येऊ लागली. महापालिकेत आ. गिरीश महाजन व आ. राजूमामा भोळे यांचा शब्द आजवर अंतीम मानला जात असला तरी अलीकडच्या काळात उघडपणे फुटीचे वातावरण दिसून येत होते.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी महापालिकेत सत्तांतर होऊ शकते असे सोशल मीडियात सुतोवाच केले होते. तर सोशल मीडियातूनही फुटीची चर्चा उघडपणे रंगली होती. गत काही दिवसांपासून महापौर व उपमहापौर पदासाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली. जातीय समीकरणे आणि गटबाजीच्या माध्यमातून आपल्याला हे पद मिळावे यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, एकीकडे भाजपमध्ये लॉबींग सुरू असतांना काही नगरसेवक हे विरोधी शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती अचानक दुपारी समोर आली. जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका बड्या नेत्याच्या फार्म हाऊसवर बैठक झाल्यानंतर अचानक काही नगरसेवक हे नॉट रिचेबल झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. या संदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांशी संपर्क साधला असता कुणीही याबाबत स्पष्ट उत्तर दिले नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार भाजपमधील काही नगरसेवकांनी शिवसेनेशी संधान साधल्याची माहिती पक्की आहे.
माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी याबाबत थेट उत्तर दिले नाही. मात्र १८ मार्च रोजीच पत्ते ओपन होणार असल्याचे ते म्हणाले. तर अपेक्षेपेक्षा जास्त लोक आमच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. यामुळे आता जळगाव महापालिकेत सत्तांतर अटळ असल्याचेही मानले जात आहे. तर भाजपकडूनही तातडीने डॅमेज कंट्रोल सुरू झाले असून सायंकाळी एका हॉटेलमध्ये पक्षाची गुप्त बैठक सुरू झाली असून यात नगरसेवकांना सांभाळण्यवर खल सुरू असल्याचे वृत्त आहे.
Jalgaon : Split In Bjp; Some Corporators May Support Shivsena In Mayor Election