
पुणे – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ज्ञानमाता सेवाभावी संस्था, पुणे संचलित ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समूह यांच्या तिसऱ्या महाअधिवेशनाचा भव्य सोहळा रविवारी (१२ ऑक्टोबर) लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कलादालन, येरवडा (पुणे) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या अधिवेशनात राज्यभरातून माहिती अधिकार क्षेत्रात आणि सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या मानाच्या पुरस्काराने जळगाव जिल्ह्यातील सामाजिक व माहिती अधिकार क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले कार्यकर्ते अमोल अशोक कोल्हे यांना गौरविण्यात आले. जनहितार्थ त्यांच्या सातत्यपूर्ण व निर्भीड कार्याची दखल घेत, पुणे महानगरपालिकेचे मुख्य कामगार अधिकारी व माहिती अधिकार नोडल अधिकारी नितीन केंजळे यांच्या हस्ते त्यांना शाल, सन्मानपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर आणि प्रा. नामदेवराव जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दोन्ही मान्यवरांनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून माहिती अधिकार चळवळीचे सामाजिक महत्त्व, नागरिकांच्या सहभागाची आवश्यकता आणि शासनाच्या पारदर्शकतेसाठी प्रत्येक नागरिकाने सजग राहण्याचे आवाहन केले.
पुरस्कार स्वीकृतीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना अमोल कोल्हे म्हणाले, “हा पुरस्कार माझ्या कार्याला अधिक प्रेरणा देणारा ठरेल. या सन्मानामुळे माझ्यावरची जबाबदारी अधिक वाढली आहे. समाजहित, सामाजिक परिवर्तन आणि जनजागृतीसाठी माझा लढा आगामी काळात अधिक जोमाने सुरू राहील.”
तसेच त्यांनी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत राहिल्याबद्दल ज्ञानमाता सेवाभावी संस्था आणि संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आढाव यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या अधिवेशनात राज्यभरातील अनेक माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. विविध जिल्ह्यांतील पारदर्शक प्रशासनासाठीचे उपक्रम, भ्रष्टाचारविरोधी मोहिमा, तसेच नागरिक जनजागृतीबाबतच्या प्रेरणादायी अनुभवांची देवाणघेवाण करण्यात आली. सुत्रसंचालन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले तर आभार ज्ञानमाता माहिती अधिकार नागरिक समूहाच्या पदाधिकाऱ्यांनी मानले.



