जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भर दिवसा हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना शहरातील शिवाजीनगर हुडको भागात घडली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

(Image Credit Source: Live Trends News)
या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, शिवाजीनगर हुडको परिसरात एका ठिकाणी आज दुपारी एक वाजेच्या सुमारास भांडण सुरू झाले. पूर्व वैमनस्यातील वादातून हे भांडण चिघळले. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. इतक्यात वाद घालणार्यांपैकी एकाने हवेत गोळीबार केला. यामुळे जमलेले लोक तेथून तात्काळ निघून गेले.

या प्रकाराची माहिती मिळताच शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी हवेत गोळीबार करणार्याला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणातील संशयिताची कसून चौकशी सुरू असून तो आधी देखील एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी असून जामीनावर सुटून बाहेर आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या प्रस्तुत प्रतिनिधीने घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांशी संवाद साधला असता त्यांनी गोळीबार झाल्याच्या घटनेला दुजोरा देऊन या प्रकरणी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती दिली. याप्रसंगी शहर पोलीस ठाण्याचे रतन गीते, प्रफुल्ल धांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे अक्रम शेख, प्रीतम पाटील यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपी दीपक बागुल याला ताब्यात घेतले आहे


