जळगाव प्रतिनिधी । मानवाला जीवन जगण्याची प्रेरणा देणाऱ्या भगवद्गगीतेची रविवारी ८ रोजी जयंती आहे. शहरातील संस्कार परिवारातर्फे रविवार ८ डिसेंबर रोजी भगवदगीता जयंतीनिमित्त गीता पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमात लहान मुलांपासून ते सर्व वयोगटातील व्यक्ती गीतेमधील अध्याय पठण करणार असून गीता जन्मोत्सव साजरा करण्यासाठी अनेक महिला मंडळे, विद्यालये आणि इतर संघटना उपक्रमात सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे यंदा ७ वे वर्ष असून दुपारी २. ३० वाजता आनंद नगर हॉल, पिंप्राळा रेल्वे गेटजवळ येथे आयोजन करण्यात आले आहे. १८ संघटनांचे २६० नागरीक गीता पठण करून वातावरण भक्तीमय करणार आहेत. यामुळे धार्मिक क्षेत्रात या उपक्रमाची विशेष नोंद होणार आहे.
यात गणगौर महिला मंडळ, संस्कार परिवार, उज्वल स्प्राउटर, पंचमुखी हनुमान मंदिर, राजस्थानी, प्रेमनगर, आदर्श, गजानन, गुजराती महिला मंडळ, अयोध्या नगर माहेश्वरी महिला मंडळ, स्वर्णकार वर्मा समाज, दत्त कॉलनी गीता परिवार, उज्वल इंग्लिश स्कूल, आदिशक्ती मंडळ, अखिल भारतीय मारवाडी मंच, पाळधी महिला ग्रुप, तरसोद कन्या मंडळाच्या विद्यार्थिनी, जळगावचे गोपग्वाल ह्या संघटना सहभागी होतील. भगवदगीता ग्रंथाची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात होईल. ४ वर्षाच्या मुलापासून ते ९० वर्षाच्या व्यक्तीपर्यंत गीता अध्याय पठण करणार आहेत. कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन संस्कार परिवारातर्फे करण्यात आले आहे.