जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मोठा उलटफेर होऊन संजय पवार यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी अमोल पाटील यांची वर्णी लागली आहे.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२१ च्या अखेरीस झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलला स्पष्ट बहुमत मिळाले होते. यानंतर अध्यक्षपदी गुलाबराव देवकर तर उपाध्यक्षपदी शामकांत सोनवणे यांची निवड झाली होती. ठरल्यानुसार, एक वर्षाने दोन्ही पदे बदलण्यात येणार होती. मात्र यासाठी विलंब झाल्याने चर्चेला उधाण आले होते. अखेर काही दिवसांपूर्वी दोन्ही मान्यवरांनी राजीनामा दिल्याने आज निवड प्रक्रिया राबविण्यात आली.
दरम्यान, आज राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या संचालकांची बैठक ही राष्ट्रवादीचे गटनेते आ. एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात अध्यक्षपदासाठी रवींद्रभैय्या पाटील यांची निवड निश्चीत करण्यात आली. तर उपाध्यक्षपदासाठी अमोल चिमणराव पाटील यांचे नाव पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निश्चीत करण्यात आले.
सकाळी अकराच्या सुमारास जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बँकेत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात संजय पवार यांनी देखील अध्यक्षपदासाठी अर्ज घेतल्याने उपस्थित अवाक झाले. यामुळे मोठी खळबळ उडाली. त्यांनी अर्ज मागे न घेतल्याने मतदान घेण्यात आले. यात त्यांनी बाजी मारली. तर उपाध्यक्षपदी अमोल चिमणराव पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.