जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वाळू तस्करीसह अनेक गैरकृत्यांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपातून भडगाव तालुक्यातील वाळू माफियाला एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
पाचोरा येथील प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल यांनी संजय त्रिभुवन याला एक वर्षांसाठी हद्दपार केले आहे. त्रिभुवन हा भडगाव तालुक्यातील वाक येथील रहिवासी असून वाळू चोरीच्या गुन्ह्यात वारंवार सहभाग, वाळूचोरी रोखणार्या पथकावर हल्ला, मारहाण, शिविगाळ करत ठार मारण्याची धमकी देणे, आदी गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याच्या कारणावरून उपविभागीय अधिकार्यांनी ही कारवाई केली आहे.
संजय त्रिभुवन याची दादागिरी इतकी वाढली होती की, त्याने दोन वर्षापूर्वी गस्तीवरील तलाठी एन.के.पारधी, व्ही.पी.शिंदे यांच्यावर जिवघेणा हल्ला केला होता. यानंतर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने उपविभागीय अधिकार्यांकडे दिला होता. यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.