अमळनेरात क्रांती दिनी अनोखा उपक्रम

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | क्रांती दिन अर्थात ९ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि हुतात्मा झालेल्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साने गुरूजी कर्मभूमि स्मारक समितीच्या वतीने अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्वातंत्र्य सैनिक, समाज सुधारक, संत यांच्याप्रती आगामी ९ ऑगस्ट या क्रांति-दिनी एक वेळ अन्न त्याग करून कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन अमळनेर येथील साने गुरुजी कर्मभूमी स्मारक समितीच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत समितीतर्फे निवेदन जारी करण्यात आले आहे. यात नमूद केले आहे की, देश व राज्यासह स्वातंत्र्य सेनानी, समाजसुधारक, संत या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन मानवतेचा व समतेचा विचार जनमानसात वृद्धिंगत व्हावा, यासाठी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक समितीने निर्धार केला आहे. या अनुषंगाने क्रांती दिनी एक दिवस अन्नत्याग करण्यात येणार आहे.

या वर्षी भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष हे निर्धाराचे निमित्त आहे. दरम्यान, साने गुरुजींचे स्वातंत्र्य चळवळीसाठी महत्वपूर्ण योगदान आहे. खान्देश व महाराष्ट्रातील गावागावातून स्वातंत्र्य चळवळीला तन, मन, धनाने योगदान देणारे हजारो स्वातंत्र्य सैनिक उभे करण्यात साने गुरुजींचा पुढाकार होता. महाराष्ट्रासह देश-विदेशात साने गुरुजींची खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही दिलेली प्रेरणा आजही जन-मानसांना महत्वाची वाटते. भारतीय स्वातंत्र्याचे ७५ वर्ष साजरी करताना आपल्या जीवनाचे समर्पण करणार्‍या स्वातंत्र्य सैनिकांचे आणि त्यांच्या कुटूंबाप्रति आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. त्यासाठी तालुक्यातील नागरिकांना साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन या निवेदनात करण्यात आलेले आहे. तसेच, , समता व मानवतेचा विचार वाढवण्याचा निर्धार पुढील वर्षापासून सर्व खान्देशात राबवला जाणार असल्याची माहिती देखील यात देण्यात आलेली आहे.

Protected Content