टोल नाक्यावर झोल : गुप्तांच्या तक्रारी नंतर कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नशिराबाद जवळ असलेल्या टोल नाक्यावर बनावट पावती देणार्‍या मशिन्स जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आल्यानंतर काम अपूर्ण असतांनाच नशिराबाद येथे टोल नाका कार्यान्वित करण्यात आला असून येथील भोंगळ कारभाराबाबत अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. दरम्यान, माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांना येथे गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली. या अनुषंगाने त्यांनी पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे तक्रार केली होती.

या तक्रारीची दखल घेऊन आज रात्री टोल नाक्यावर पोलिसांनी छापा मारला असता येथे नियमीत मशिन्सच्या व्यतिरक्ति दोन मशिन आढळून आल्या. यात कोणत्याही प्रकारची एंट्री न होताच वाहनधारकांना पावत्या दिल्या जात असल्याचे आढळून आले. नशिराबाद पोलिसांच्या पथकाने या दोन मशिन्स जप्त केल्या असून या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, दीपक कुमार गुप्ता यांनी याबाबत एनएचएआयचे अधिकारी चंद्रकांत सिन्हा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा टोल नाका ऑक्शनच्या माध्यमातून कार्यान्वीत करण्यात आला असून याबाबत काही गैरप्रकार असल्यास आपण स्वत: फिर्याद देणार असल्याचे सांगितले. आता या प्रकरणी पुढील कार्यवाही काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content