जळगाव प्रतिनिधी | गृहमंत्र्यांच्या जळगाव दौर्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व अन्य पदाधिकार्यांची अडवणूक केल्या प्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस स्थानकाचे निरिक्षक प्रताप शिकारे यांना तातडीने नियंत्रण कक्षात हलविण्यात आले आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील हे काल एक दिवसाच्या जिल्हा दौर्यावर आले होते. गृहमंत्र्यांचे आगमन होत असतांना त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील हे महानगराध्यक्ष मंगला पाटील, प्रवक्ते योगेश देसले आदी इतर पदाधिकार्यांच्या सोबत त्यांच्या स्वागतासाठी गेले होते. याप्रसंगी गृहमंत्र्यांचे आगमन होत असतांना तेथे सुरक्षेसाठी असणारे एमआयडीसी पोलीस स्थानकाचे निरिक्षक प्रताप शिकारे यांनी रवींद्र पाटील यांना मध्ये जाऊ न देता त्यांच्याशी अरेरावी केली. अन्य पदाधिकार्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील याच प्रकारची वागणूक मिळाली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्यांनी या संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे तक्रार केली. गृहमंत्र्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना या संदर्भात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. यानुसार रात्री उशीरा प्रताप शिकारे यांना पोलीस नियंत्रण कक्षात हलविण्यात आल्याचे वृत्त आहे.