जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जळगावच्या दौर्यात आपल्या शासकीय वाहनातून भाजपच्या जिल्हाध्यक्षांना सोबत घेऊन ते स्वत: भाजपचे असल्याचे दाखवून दिल्याची खरमरीत टीका एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली आहे.
एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी आज एका पत्रकाच्या माध्यमातून राज्यपालांवर टीका केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त विधान करणारे व महाराष्ट्राच्या इतिहासाची जाण नसलेले राज्यपाल भगतसिंह कोशयारी हे मूळ भाजप पक्षाचेच असल्याचे आज सिध्द झाले .
या पत्रकात म्हटले आहे की, भारताचे संविधान सांगत की राज्याचे राज्यपाल हे कुठल्याही पक्षाचे नसतात. प्रोटोकॉल नुसार राज्यपाल जिल्हा दौर्यावर आले असता त्यांच्या सोबत कुठल्याही एका विशिष्ट पक्षाचा पदाधिकारी त्यांच्या गाडीत फिरू शकत नाही . परंतु आज जळगाव जिल्ह्यात राज्यपाल आले असता त्यांनी राज्यपाल पदाची गरिमा न राखता जळगाव जिल्हा भाजप पक्षाचे जिल्हाध्यक्ष व भाजपचे आमदार राजू भोळे यांना आपल्या गाडीत घेऊन फिरले. जिल्ह्यात जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना भाजप पदाधिकार्याला आपल्या सोबत घेऊन फिरणे हेच दर्शवते की राज्यपाल महाराष्ट्राचे नाही भाजप पक्षाचे च आहेत.
देवेंद्र मराठे यांनी पुढे म्हटले आहे की, राज्यपालांनी भाजपच्या संस्कृतीला धरून काल त्यांनी महाराष्ट्र च आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेलं अपमानजनक वक्तव्य… ह्या दोन्ही गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत निंदनीय व दुर्दैवी आहेत. आपण एनएसयुआयच्या माध्यमातून याचा निषेध करत असल्याचे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.