ज्ञानेश मोरे यांची राजमाता येसूबाई संभाजी भोसले कादंबरी प्रकाशित ( व्हिडीओ )

जळगाव तुषार वाघुळदे। शहरातील जेष्ठ साहित्यिक, कादंबरीकार, गीतकार,कवी ,इतिहासकार तसेच जिल्हा दूध फेडरेशनचे माजी कार्यकारी संचालक ज्ञानेश मोरे यांनी कोरोनाच्या पाच महिन्याच्या लॉकडाऊन कालावधीत महाराणी येसूबाई संभाजी राजे भोसले यांच्या जीवनावर प्रदीर्घ ऐतिहासिक कादंबरीचे लिखाण केले असून ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. याबाबत त्यांची घेतलेली ही मुलाखत.

ज्ञानेश मोरे यांनी रयतेचे जाणते राजे छत्रपती श्री.शिवाजी महाराज यांची स्नुषा..महापराक्रमी , शौर्य आणि धैर्याचा महामेरू असलेले स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री.संभाजी राजे यांच्या धर्मपत्नी रणरागिणी महाराणी येसूबाई साहेबांच्या बाल्यावस्थेपासून तर त्यांच्या अखेरच्या श्‍वासापर्यंतचा जवळपास ७१ वर्षांचा जीवनपट कादंबरीत शब्दबद्ध केला आहे.एकूण पृष्ठसंख्या ३७० इतकी आहे.महाराणी येसूबाई ह्या छत्रपती शिवाजीराजे यांच्या स्नुषा व दुसरे छत्रपती श्री.संभाजीराजे यांच्या धर्मपत्नी होत्या. हिंदवी स्वराज्य वर्धिष्णू व्हावे , अबाधित राहावे आणि सुरक्षित राहावे , म्हणून त्यांनी २९ वर्षे , आठ महिने १९ दिवस इतका प्रचंड राजबंदीवास उत्तरेत भोगला. स्वतेजाने तळपणारी , स्वाभिमानाने जगणारी राजमाता येसूबाई हिंमतीने लढणारी वीरांगना , कर्तृत्ववान साम्राज्ञीच होती.

औरंगजेबाचा सेनापती जुल्फिकार खान याने रायगड किल्ल्यावरून महाराणी येसूबाईंना राजबंदी केले. स्वराज्याची देखभाल राजबंदीवासात असतानाही केली. आणि जिंजीची गादी शाबूत व कर्नाटकातली जिंजीची गादी छत्रपती राजाराम महाराजांद्वारे शाबूत ठेवली. महाराणी येसूबाई भोसले ह्या तशा उपेक्षित महाराणी म्हणता येईल. इतिहासाने हवी तशी दखल या महाराणीची घेतली गेलेली नाही, हे शल्य मनी आहे .मराठी माणसाच्या घराघरात व मनामनात त्या वसाव्यात ही भावना या कादंबरीमागे असल्याचे मत साहित्यिक तथा कादंबरीकार ज्ञानेश मोरे यांनी व्यक्त केले.महाराणी येसूबाई ही कादंबरी लिहिताना लेखक ज्ञानेश मोरे यांनी प्रत्यक्षपणे अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या असून अनेक जुन्या जाणकार व अभ्यासकांशी त्यांनी चर्चा केली आहे.

पुण्याचे प्रकाशक कुणाल हजेरी ( चेतक बुक्स ) यांनी ही कादंबरी प्रकाशित केली असून महाराणी येसूबाई साहेबांचे मुखपृष्ठ शिवचित्रकार व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मिलिंद विचारे यांनी रेखाटले आहे.
साहित्यिक श्री.मोरे यांचा सोनपहाट ( काव्यसंग्रह ), बालमजुरांच्या समस्येवर म राबणारे कोवळे हात म, हिरवाईची गाणी , शिवार पाणी , ठेलारी या भटक्या जमातीवरची ग्रामीण कादंबरी ढाबळ ,मोगलकालीन ऐतिहासिक प्रेमकथा गुलारा बेगम ,चरित्रात्मक तो हा पांडुरंग ,माती-बुक्का ( काव्यसंग्रह ) आदी साहित्य प्रकाशित झाले असून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील २८ साहित्य पुरस्कारांनी त्यांना गौरविले आहे .कोरोना लॉकडाऊन मध्येच त्यांची रेल्वे हमाल ( कुली ) यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित बिल्ला या कादंबरीचेही लिखाण पूर्ण झाले असून ते साहित्य प्रकाशकाकडे पाठविले आह. तसेच संत तुकाराम यांच्यावरही त्यांचे पुस्तक येत्या कालावधीत प्रकाशित होईल असा मानस साहित्यिक, कादंबरीकार ज्ञानेश मोरे यांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला आहे.

खालील व्हिडीओत पहा ज्ञानेश मोरे यांची सविस्तर मुलाखत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/607340836598354/

Protected Content