जळगाव प्रतिनिधी । सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी म्हणजेच ग. स. सोसायटीची निवडणूक ही ईव्हीएमचा वापर करून घेण्याची मागणी संस्थेचे माजी अध्यक्ष उदय पाटील यांनी सहकार आयुक्तांकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
या संदर्भात सहकार आयुक्तांन पाठविलेल्या निवेदनात उदय पाटील यांनी म्हटले आहे की, ग.स. सोसायटीच्या २१ संचालकांची निवडणूक लवकरच होणार आहे. सध्या सोसायटीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून, आगामी काळात स्थगिती उठल्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. गेल्या पंचवार्षिकचा अनुभव घेता ग.स. सोसायटीच्या निवडणुकीसाठी सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च झाला होता. बॅलेट पेपरवर मतदान घेतल्याने मतमोजणीसाठी ४८ तासांचा कालावधी लागला होता. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची नियुक्ती करावी लागली होती. मतमोजणीस जास्त काळ लागल्याने त्यात कर्मचारी हे थकल्याने मतमोजणीत अनेक अक्षम्य चुका होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सहकार विभागाच्या आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यात पुढे म्हटले आहे की, ग.स. सोसायटीमध्ये स्थानिक ५, बाहेरील ११, अ.ज./ जमाती (राखीव) १, महिला राखीव २, इतर मागासवर्गीय राखीव १, अ.वि.जा./वि.मा.प्र.वर्ग (राखीव) १ अशा २१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या २१ जागांसाठी सुमारे ४० हजार सभासद मतदान करतील. प्रत्येक तालुक्यासाठी १० इव्हीएम मशीनची गरज भासणार आहे. मतदानातील चुका टाळल्याने मतदान बाद होण्याचे प्रमाणही कमी होईल. मतमोजणीसाठी मनुष्यबळ कमी लागेल तसेच कमी वेळेत निकाल जाहीर करणे शक्य होईल. याशिवाय सहा मतपत्रिका छपाईसाठी येणारा स्टेशनरी खर्च, कर्मचार्यांना भत्ता, मतमोजणीसाठी लागणारा वेळ लक्षात घेता संस्थेच्या लाखो रुपयांच्या निधीची बचत होईल असे निवेदनात म्हटले आहे.