जळगावच्या राजकारणावर तब्बल साडे तीन दशके एकछत्री अंमल असणारे माजी मंत्री तथा आमदार सुरेशदादा जैन यांचा आज वाढदिवस. आज ते राजकारणात सक्रीय नसले तरी या शहराच्या वाटचालीत त्यांचे मोलाचे योगदान ना कुणी नाकारू शकणार ना कुणी त्यांचा ठसा पुसू शकणार…त्यांच्या राजकीय व सामाजिक वाटचालीतील बरेवाईट प्रसंग हे जगासमोर आहेच. यावर भाष्य करण्याचा आमचा मानस नाही. तथापि, जगासमोर फारशा न आलेल्या अनेक घटनांमधून हा माणूस किती मोठ्या मनाचा होता याची प्रचिती येते.
आणि हो….जळगावकरांनी दादांना शेवटी पराभूत केले, त्यांना घरी बसविले. मात्र जळगावपासून शेकडो किलोमीटर अंतरावर असणार्या कच्छमधील लोकांनी त्यांना भूकंपग्रस्तांसाठी केलेल्या कामांमुळे आपल्या भागातून निवडणूक लढविण्याची जाहीर विनंती केली होती हा विरोधाभास सुध्दा आपल्याला समजून घ्यावा लागेल. अशाच काही मोजक्या लक्षणीय घटनांना आपल्या समोर सादर करत आहेत लाईव्ह ट्रेंडस् न्यूजचे सल्लागार संपादक ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल.
जळगाव शहराचे दीर्घकालीन अनभिषिक्त सम्राट माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा आज वाढदिवस… चारित्र्यवान, दिलदार मनाच्या या व्यक्तिमत्वास हृदयापासून शुभेच्छा…
जळगाव जिल्ह्याच्या गत चाळीस वर्षांच्या वाटचालीत राजकरणातील दादा तथा जनसामान्यांचा सर्व समावेशक राजकीय चेहरा सध्या तरी सक्रीय राजकारणापासून दूर आहे. वादळी व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्राला परिचित हा चेहरा राजकीय क्षितिजावर पुन्हा चमकेल का? या प्रश्नाचे उत्तर फक्त काळच देऊ शकेल. राजकीय क्षेत्रात विविध नेत्यांच्या कार्यशैली अथवा गुण वैशिष्ट्याची परस्परांशी तुलना राजकीय निरीक्षक, अभ्यासकांकडून केली जाते. मात्र दादांची गुणवैशिष्ट्ये जगावेगळीच अनुभवास आली आहेत. प्रवाहाच्या विरुद्ध जात वादळांना स्वतः आमंत्रण देत त्यांना तेवढ्याच ताकदीने आव्हान देत निष्प्रभ करण्याची किमया त्यांनी आपल्या दीर्घकाळाच्या वाटचालीत दाखवून दिली. जळगाव शहराच्या विकासासाठी अशक्य वाटणारे प्रकल्प राबविण्याच्या प्रयत्नांना विरोध करणार्या विरोधकांच्या आव्हानांचा त्यांनी तितक्याच ताकदीने सामना केला. त्यांनी केलेली लहान-मोठी कामे जगजाहीर आहेच. पण त्यांनी केलेली काही कामे अशीही आहेत की, त्या कामांची अथवा त्यांनी माणुसकी म्हणून केलेल्या कृतीची सर्वसमान्यांना कल्पना नसावी. अशा काही निवडक मात्र त्यांच्यातील माणुसकीचे तसेच जात-पात व धर्मा पलीकडचे दर्शन घडविणारी आहेत… आपल्यासाठी असेच मोजके किस्से सादर करत आहोत.
अनटोल्ड स्टोरी क्रमांक एक
१९८५ सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत सुरेशदादा जैन यांनी काँग्रेसचे रमेश पंडित चौधरी यांचा पराभव केला. अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत सुरेशदादा जैन हे काँग्रेसकडून निवडून आले. दरम्यान, श्री चौधरी पराभूत झाल्यानंतर शहरातील काही मंडळी दादांना भेटले. त्यांनी विनंती केली की जळगाव शहरातील एस.टी. महामंडळाच्या वर्कशॉपच्या शेजारील जागा ही रमेश चौधरी यांची असून ती पालिकेने संपादित केलेली आहे. ती जागा लगेच पालिकेच्या ताब्यात घ्यावी अशी विनंती त्यांनी दादांना केली तेव्हा दादा म्हणाले, “मुळीच नाही , चौधरी निवडणुकीत माझे प्रतिस्पर्धी होते शत्रू नव्हे !” एवढं सांगून दादा थांबले नाही तर त्यांनी ती जागा चौधरींना परत करण्याचा निर्णय घेत तातडीने अंमलातही आणला. अशी उदारता आजच्या राजकारणात आहे का?
अनटोल्ड स्टोरी क्रमांक दोन
मुस्लिम समाजाचे नेते अब्दुल गफ्फार भाई मलिक व करीम सोलर तसेच त्यांच्या ईकरा सहकारी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी धडपडत होते. त्यांच्यासमोर सर्वात मोठी अडचण ही साहजीकच आर्थिक होती. ती दूर करण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांच्या चॅरिटीचा जळगावला कार्यक्रम घडवून आणण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी ते मुंबईला गेले. त्यांनी दिलीप कुमार साहेबांची भेट घेतली व त्यांनी येण्याचे प्रयोजन सांगितलं. तेव्हा दिलीप कुमार साहेब म्हणाले, संस्थेसाठी किती मिळेल ? कमी पैशात मी तिकडे येणार नाही. त्यापेक्षा जास्त किंवा ११ लाखापर्यंत कोणी देणगीदार असेल तरच मी तुमच्या संस्थेच्या मदतीसाठीच्या कार्यक्रमाला तिथे येईल.तेव्हा गफ्फार भाई आणि करीम सालार यांचा हिरमोड झाला आणि ते परत आले.
अभिनेते दिलीप कुमार यांच्या कार्यक्रमाच्या तारखे साठी करीम सालार आणि गफ्फार भाई हे मुंबईला गेलेले होते, ही बाब सुरेशदादांना माहित होती. त्यामुळे त्यांनी गफ्फारभाई यांच्याकडे विचारणा केली की, ”दिलीप कुमार यांच्या कार्यक्रमाचं काय झालं ?” त्या दोघांनी दादांना सांगितले की दोन-तीन लाखाच्या वर्गणीसाठी दिलीप कुमार साहेब येऊ शकत नाही. यासाठी किमान ११ लाख रुपये देणारा देणगीदार मिळाल्या शिवाय ते होकार देणार नाहीत. तेव्हा दादांनी त्यांना ताबडतोब मुंबईला जा आणि त्यांची जळगाव कार्यक्रमासाठी तारीख निश्चित करा, असे बजावले. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे निधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी राहील, असे दादांनी सांगितले. त्या नंतर सालार आणि मलीक हे पुन्हा मुंबईला गेले. त्यांनी दादांचा निरोप दिलीप कुमार यांना दिला. तेव्हा ते मोठ्या आनंदाने जळगावला सपत्नीक अर्थात सायराबानू यांच्यासह जळगावला आले. ते दादांच्या बंगल्यावरच सपत्नीक थांबले. कार्यक्रम दिमाखदार झाला, दादांच्या दातृत्वाचे कौतुक ही दिलीप कुमार यांनी केले. अर्थात, दादांच्या दानशूर वृत्ती मुळे अल्पसंख्यांक समाजाची ही शिक्षण संस्था आज उभी आहे. आणि नुसती उभीच नव्हे तर प्रगतीपथावरून गतीने आगेकूच करत आहे.
अनटोल्ड स्टोरी क्रमांक तीन
चाळीसगाव ची ही घटना आहे…
साधारणपणे ही घटना १९८८ मधील आहे. चाळीसगाव येथे एका सार्वजनिक सभेसाठी दादा आले होते. त्यावेळेस तेथील आमदार वासुदेवराव चांगरे हे त्यांच्या सोबत होते. दादा जेथे जात तेथे त्यांच्यासोबत विविध जाती-धर्माचे दहा-बारा कार्यकर्तेे असत. चाळीसगाव मधील सभा दुपारी बारा वाजता होती. ती सभा संपल्यानंतर दादांनी दुपारचे जेवण आपल्याकडे घ्यावे, असं चाळीसगाव मधील त्यांच्या सख्ख्या मावशीचा आग्रह होता. तेव्हा त्यांचे मावसा दादांच्या सभास्थळी दादांना भेटले व त्यांना दुपारच्या जेवणाचे निमंत्रण दिले.दादांनी त्यांना सांगितलं की मी एकटा नसतो माझ्याबरोबर दहा-बारा सहकारी कार्यकर्ते असतात. तेव्हा त्यांचे मावसा म्हणाले “काही हरकत नाही जेवढे असतील त्यांना घेऊन या आम्ही सर्वांना जेवू घालू…!” प्रत्यक्षात जेव्हा मावशीच्या बंगल्यात जेवायला गेले तेव्हा त्यांच्या सोबतच्या मंडळींना बघून त्यांचे मावसा म्हणाले तुम्ही या मंडळीबरोबर जेवणार का? दादा त्यांचा अशा पद्धतीची विचारणा दादांना खटकली ते संतापले आणि म्हणाले “मी या मंडळी बरोबरच जेवणार अन्यथा तुमच्याकडचं जेवण आम्हाला नको.” हे एकूण त्यांचे मावसा थोडे थंड झाले. म्हणाले, “…नको सर्व जण या आम्ही सर्वांना प्रेमाने जेऊ घालू !” म्हटलं तर ही तशी खूप छोटी बाब आहे. पण यामागे दादांचे भावविश्व प्रकट होते. सामाजिक बंधूभाव त्यांच्या स्थायी किती घट्ट होता हे त्यातून स्पष्ट होते.
अनटोल्ड स्टोरी क्रमांक चार
गुजरात मधील २००१ मधील भूकंप भूजमध्ये भूकंप सर्वांना आठवत असेल. यात हजारोंचा बळी गेला होता. तर वित्तहानी देखील खूप प्रचंड झाली होती. दादा या दुर्घटनेमुळे विचलित झाले होते. मानवधर्म म्हणून आपण भूकंपग्रस्तांसाठी काही तरी करावं म्हणून त्यांनी तातडीने भूज गाठले. त्यांनी तिथे भूकंपग्रस्तांसाठी शाळा बांधणीचा कार्यक्रम हातात घेतला. अनेक महिने ते थांबुन होते. त्या परिसरातील त्यांनी ३६८ शाळांच्या अकराशे पेक्षा जास्त खोल्यांचे बांधकाम पूर्ण केल्यानंतर ते जळगावला आले. त्यांची धडपड आणि त्यांचे एकूण मानवता व समानतेबद्दल समाजाबद्दल असलेल्या प्रेम लक्षात घेऊन तेथील काही जाणकार मंडळी त्यांना भेटली. आणि ते म्हणाले दादा तुम्ही महाराष्ट्रातले तर आम्ही गुजरात मधले ! दुःख गुजरातला झालेले आहे आणि त्याचा परिणाम जळगाव मध्ये दिसून येतोय ! तुम्ही केलेले कार्य कधीही आम्ही विसरू शकत नाही. पण आम्ही आपल्याला विनंती करतो की आपण कच्छ भागामध्ये येऊन येथून निवडणूक लढवावी आम्ही सर्वजण तुम्हाला जिंकून आणू…! तसं पाहिलं असतं तर कुठे जळगाव आणि कुठे गुजरात ? पण शेकडो किलोमीटर अंतरावर राहणार्या नेत्याला त्याच्या मानवतावादी कार्याबद्दल अशी पोचपावती मिळवणारे हे पहिलेच उदाहरण असावे.
अनटोल्ड स्टोरी क्रमांक पाच
जळगावच्या नव्या बस स्थानकाच्या शेजारी पालिकेचे गांधी उद्यान आहे. त्यामध्ये एक दुमली इमारत ही आहे. तेथे रुपाली नावाची खानावळ होती. कालांतराने त्या खानावळीचा भाडे करार संपल्यानंतर, नव्याने काही हॉटेल व्यावसायिकांच्या निविदा पालिकेकडे आल्या. तेव्हा त्यावर दादा विचार करीत होते की कुणाला ही मोक्याची जागा द्यावी ? गांधी उद्याना सारख्या जागेत खानावळ नकोच असा विचारही त्यांनी केलेला होता. नेमकं त्याच वेळी त्यांचे एक हितचिंतक सामाजिक कार्यकर्ते विजयजी चोरडिया उर्फ काकाजी दादांकडे आले. तेव्हा जागा कुणाला द्यावी ? हा विषय निघाला तेंव्हा चोरडीया म्हणाले, दादा आपण भगवान महावीरांचे विचार मानतो आणि खानावळ अथवा हॉटेल व्यवसायिकास आपण जागा दिली की तेथे पुन्हा मांसाहार, दारू विक्री होईल. तेव्हा ही जागा अशा लोकांना न देता डॉ. अविनाश आचार्य यांच्या सामाजिक संस्थेला द्यावी कारण डॉ.आचार्य झुणका भाकर केंद्रासाठी जागा शोधत आहेत. हा विचार दादांना खूप आवडला व त्यांनी ताबडतोब संस्था चालकांना बोलावून नाममात्र दरावर ती जागा देऊन टाकली. आज त्या जागेवर असणार्या क्षुधा शांती केंद्रात गरजूंना विशेषत: दिव्यागांना रोजगार तर मिळालाच. पण शिवाय असंख्य लोकांची झुणका-भाकरची सोया झाली….आता प्रश्न हाच की दादा व्यापारी वृत्तीचे की सामाजिक व धार्मिक वृत्तीचे…?
समारोप….
सुरेशदादा जैन यांचं औदार्य, विविध समाजां बद्दलची आस्था व आपुलकी ही त्यांच्या प्रदीर्घ वाटचालीतील ही अनटोल्ड स्टोरी त्यांच्या व्यक्तिमत्वाची पावती म्हणता येईल. राजकीय क्षेत्रात प्रत्येक नेत्याला कुणी तरी संधी दिली म्हणून ते मोठे झाले. मग पक्ष असेल किंवा वरिष्ठ नेत्यांची शिफारस असेल.परंतु दादा बद्दल असे कधीही घडलेले नाही. एकूणच ते आपल्या दिर्घ राजकीय प्रवासात त्यांनी एक नव्हे तर चार वेळा आपली भूमिका बदलली आणि बदलेल्या भूमिकेचा निकाल जनतेकडुन घेतला. हे देखील राजकारणातील दुर्मिळ उदाहरण म्हणता येईल. चारित्र्यवान, शब्दाला जगणारा आणि आताच्या प्रतिकूल परिस्थिती ही समाजातील होतकरू गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्वारे मदत करून आपली दानी वृत्तीवर कायम राखणारा व्यक्ती बेकायदेशीर कामे कशी करेल ? असो…
राजकारणात अख्खी हयात लोकांच्या कल्याणा सह स्वतः च्या चारित्र्याची जपवणूक करणारे अजून ही आहेत, तरीपण कुणास ठाऊक दिवंगत कवी राहत इंदोरी….. असे का म्हणुन गेले?
बनके इक हादसा बाजारमे आ जायेगा,
जो नहीं होगा वो अखबार मे आ जायेगा ।
चोर उचक्को की करो कद्र, की मालूम नही
कौन, कब कौनसी सरकार मे आ जायेगा..॥
: सुरेश उज्जैनवाल
संपर्क क्रमांक : ८८८८८८९०१४