जळगाव प्रतिनिधी । कोविड-19 प्रादुर्भाव रोखणे व मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्ह्यात 28 एप्रिल ते दिनांक 2 मे या कालावधीत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत कुटुंबांचे सर्वेक्षण मोहिम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.
कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भाव झालेल्या बाधित रुग्णांचे लवकर निदान झाल्यास त्यांच्यावर लवकर उपचार करून रुग्णांचे प्राण वाचविता येते. तसेच त्यांचे विलगीकरण केल्यामुळे त्यांच्यापासून इतर व्यक्तींना होणारा संसर्गसुध्दा टाळता येतो. कोविड-19 विषाणूच्या पहिल्या लाटेमध्ये ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत घरोघरी जावून कुटुंबाचे सर्वेक्षण केले होते. या मोहिमेमुळे जिल्ह्यात लक्षणे असलेले व बाधित रुग्ण शोधण्यात मदत झाली होते. परिणामी पहिल्या टप्प्यातील साथ आटोक्यात आणण्यास या मोहिमेचा प्रभावी उपयोग झाला आहे.
याच धर्तीवर कोविड-19 ची साथ आटोक्यात आणण्यासाठी नाशिक विभागात 28 एप्रिल ते 2 मे या कालावधीत सर्वेक्षण मोहिम राबविण्याबाबत विभागीय आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
‘लवकर निदान, लवकर उपचार’ यानुसार जिल्ह्यात 28 एप्रिल, ते 2 मे, 2021 या कालावधीत ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्यात येणार असून या मोहिमेत संशयित रुग्ण शोधणे तसेच कोमाॅर्बिड रूग्णांची माहिती संकलित केली जाणार आहे. या मोहिमेद्वारे दररोज झालेल्या सर्वेक्षणाची माहिती संकलीत करण्याची जबाबदारी तालुकास्तरावर तालुका वैद्यकीय अधिकारी व जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य अधिकार्यांवर सोपविण्यात आली असून ‘लवकर निदान, लवकर उपचार’ हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याची आवश्यक ती कार्यवाही सर्व संबंधित यंत्रणांनी तात्काळ करावी. जेणेकरून कोरोनाची लक्षणे असलेल्या सर्व व्यक्ती या सर्वेक्षणातून शोधण्यात मदत होऊन कोरोनाची साखळी खंडीत करता येईल असेही जिल्हाधिकार्यांनी म्हटले आहे.
या मोहिमेतंर्गत घरोघरी येणा-या तपासणी पथकांना सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.