जळगाव प्रतिनिधी । अमृत योजनेत खोदण्यात आलेल्या खड्डयासमोर कोणत्याही प्रकारचे बॅरीकेडस अथवा सूचना नसल्याने तरूण दुचाकीसह यात पडल्याची घटना रात्री घडली आहे.
याबाबत वृत्त असे की, मनसेचे जिल्हा सचिव जमील देशपांडे यांचा मुलगा जुबेर देशपांडे (वय २४) हा काल रात्री १० वाजता घरी येत असताना आदर्श नगर येथील अमृत योजना पाईपलाईन मधील ६ फूट खोल खड्ड्यात गाडीसह पडला.
कोणत्याही प्रकारची बॅरिकेट नसलेल्या या खड्ड्यात काही तासंमध्येच तीन लोक पडले आहेत. जुबेर देशपांडे याला किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या असून नशीब बलवत्तर म्हणून जीव वाचला.
असे जीवघेणे खड्डे व कामाचा निष्काळजी पणा लोकांचे जीव घेईल या बाबत आयुक्तांनी त्वरित लक्ष घालावे अशी मागणी अॅड जमील देशपांडे यांनी केली आहे. संपूर्ण शहर खड्डेमय झाले असून अमृत योजना विष योजना झाली आहे. आपण याबाबत आयुक्त व महापौर यांची भेट घेणार असून कामाच्या बाबतीत जो निष्काळजीपणा सुरू आहे त्याची तक्रार करणार असल्याचे अॅड. जमील देशपांडे यांनी म्हटले आहे.