जिल्ह्यात रमजान ईद साधेपणाने साजरी

जळगाव, प्रतिनिधी । सध्या सुरू असणार्‍या कडक निर्बंधांच्या पार्श्‍वभूमिवर आज जिल्ह्यात रमजान ईद साधेपणाने साजरी करण्यात आली असून सामूहिक नमाज ऐवजी वैयक्तीक पातळीवर नमाज पठन करून कोरोनाच्या प्रतिकारासाठी दुवा मागण्यात आली.

मुस्लीम धर्मियांसाठी रमजान ईद हा वर्षातील सर्वात मोठा व पवित्र सण असतो. गेल्या वर्षी रमजान ईदच्या वेळी राष्ट्रव्यापी लॉकडाऊन असल्याने ईद साधेपणाने साजरी करण्यात आली होती. तर यंदा पूर्ण लॉकडाऊन नसला तरी कडक निर्बंध लादण्यात आलेले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह जिल्हा प्रशासनाने ईद सणानिमित्त नियमांचे पालन करून साधेपणाने हे पर्व साजरे करण्याचे आवाहन केले होते. यानुसार आज जिल्ह्यात ईद साजरी करण्यात आली. कडक निर्बंधांच्या पार्श्‍वभूमिवर, जळगाव ईदगाह मैदानावर साधेपणाने मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत नमाज पठण करण्यात आले.

आज सकाळी व दुपारच्या नमाजचे पठण हे प्रत्येकाने घरीच केले. तर यंदा ईदनिमीत्त आप्त आणि मित्रमंडळींना शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात झाल्याचेही दिसून आले आहे. जळगाव प्रमाणेच भुसावळसह सर्व तालुक्यांमध्ये याच प्रकाणात ईदचा सण साजरा करण्यात आल्याचे वृत्त आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.