जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे टोकरे कोळी समाजाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अनंत अडचणी येत असतांनाच दोन समाजबांधवांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या तत्परतेने तात्काळ प्रमाणपत्र मिळाले आहे.
जळगाव जिल्ह्यातील टोकरे कोळी समाजबांधवांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. यासाठी अनेक पातळ्यांवरू प्रयत्न करून देखील ही समस्या सुटत नसल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने मुक्ताईनगर येथील टोकरे कोळी बांधवांना येणार्याअडचणी पाहता माजी जिल्हापरिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर यांनी पुढाकार घेत रावेर मतदार संघातील खासदार रक्षाताई खडसे यांच्या मार्फत टोकरे कोळी बांधवांना जातप्रमाणपत्र मिळतांना येणार्या अडचणींचे निराकारण व्हावे म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी फैजपूर,भुसावळ प्रांताधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, या बैठकीत खासदार रक्षाताई खडसे, अशोक कांडेलकर आणि अजय कोळी आदींनी जात प्रमाणपत्रासाठी आवश्यक ते प्राथमिक कागदपत्र पाहून जात प्रमाणपत्र दिले पाहिजे असा आग्रह धरला. कायद्यातील तरतुदी पाहता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीही तशी सहमती दाखवली. याच बैठकीत चोपडा तालुक्यातील गलंगी येथील शेतकरी रमाकांत देवराज व अशोक देवराज यांना टोकरे कोळी जमातीच्या प्रमाणपत्राचा विषय समोर आला. कुटुंबासह रक्तनात्यामध्ये जात वैधता असतांनाही अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कडून देवराज परिवारास टोकरे कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र देणे क्रमप्राप्त होते. पण तब्बल सहा महिन्यांपासून रमाकांत देवराज हे अमळनेर उपविभागीय कार्यालयात चकरा मारत असल्यानंतरही त्यांना लालफितशाहीमुळे प्रमाणपत्र मिळत नव्हते.
या अनुषंगाने प्रवर्तन बहुउद्देशीय संस्थेचे सदस्य चेतन देवराज यांनी शेतकरी परीवारातील रमाकांत देवराज व अशोक देवराज यांच्या रक्तनात्यात वैधता असतांनाही त्यांना जात प्रमाणपत्र मिळत नसल्याची तक्रार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे केले. यावेळी झालेल्या चर्चेत ए. एस. कोळी, चेतन देवराज,भिका सोनवणे,योगेश कोळी, संदीप शिरसाळे व अशोक शिरसाळे यांनी भाग घेतला.
तळागाळातील जनसामान्य लोकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असणारे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तात्काळ याच बैठकीत चेतन देवराज यांच्याकडून प्रलंबीत जात प्रमानणपत्राबाबत टोकन नंबरची माहिती घेतली. यानंतर त्यांनी तात्काळ बैठकीत संबधीत अधिकार्यांना जातप्रमानपत्रा बाबत कार्यवाही करण्याबाबत आदेश दिलेत.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश दिल्यानंतर अमळनेर प्रांत कार्यालयातील सुस्त यंत्रणा हालली. यामुळे रमाकांत देवराज व अशोक देवराज यांना टोकरे कोळी जमातीचे जात प्रमाणपत्र मिळाले. जिल्हाधिकार्यांनी तत्परता दाखविल्यामुळे दोन समाजबांधवांना टोकरे कोळी जमातीचे प्रमाणपत्र मिळाले आहे. दरम्यान, रमाकांत देवराज व अशोक देवराज यांनी अभिजित राऊत,खासदार रक्षा खडसे व अशोक कांडेलकर यांचे आभार मानले आहेत. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या सारखी तत्परता प्रशासनातील सर्वच अधिकार्यांनी बाळगावी अशी अपेक्षा टोकरे कोळी समाजातून व्यक्त होत आहे.