जळगाव Jalgaon प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनी सामूहिक राजीनाम्याचा निर्णय मागे घेतल्याने विद्यमान अध्यक्षांना दिलासा मिळाला आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे Jalgaon Apmc अध्यक्ष कैलास चौधरी यांच्या विरोधात संचालकांनी सामूहिक राजीनाम्याचा निर्णय घेतला होता. कृषी उत्पन्न बाजार समितीतील शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या बांधकामाबाबत असलेल्या गैरसमजातून संचालक सामूहिक राजीनामे देणार असल्याबाबत जाहीर केले होते. यामुळे सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली होती. त्याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर गैरसमज दूर झाला असून संचालकांच्या राजीनाम्यांचा विषय संपला असल्याचे सभापती कैलास चौधरी यांनी सांगितले. सभापती चौधरी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
या वेळी १८ संचालकांपैकी उपसभापती सुरेश पाटील, संचालक अनिल भोळे, प्रभाकर पवार, प्रशांत पाटील, पंकज पाटील, वसंत भालेराव, सिंधुबाई पाटील यांचे पती मुरलीधर पाटील व यमुनाबाई सपकाळे यांचे पुतणे कॉमेश सपकाळे उपस्थित होते. सर्व संचालकांनी पालकमंत्री पाटील यांच्याशी मोबाइलवर चर्चा केली. त्यानुसार त्यांचा पाठिंबा चौधरी यांना राहणार आहे. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती, उपसभापती व सर्व संचालक शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही सांगण्यात आले. या आशयाचे प्रसिद्धी पत्रकही काढण्यात आलेले आहे. त्यावर सभापती, उपसभापतींसह ९ संचालकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.