जळगाव प्रतिनिधी । परिवर्तन संस्थेतर्फे पद्मश्री डॉ. भंवरलाल जैन यांच्या जयंतीनिमित्त भाऊंना भावांजली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ ते १६ डिसेंबर दरम्यान हा महोत्सव होणार आहे.
भावांजली महोत्सवाचे प्रमुख अनिस शहा, अनिल कांकरिया, आनंद मलारा, किरण बच्छाव, अमर कुकरेजा, नंदलाल गादिया व नारायण बाविस्कर हे आहेत. महोत्सवाची सुरवात ङ्गवेणुत्सवफने होणार आहे. भाऊंना बासरी खूप आवडायची. त्यानिमत्त त्यांच्या जन्मदिनी वेणूत्सव हा २० बासरी वादकांच्या बासरी वादनाने महोत्सवाचे उद्घाटन होईल.
पाच दिवसीय महोत्सवात सोमवार वगळता सर्व कार्यक्रम भाऊंच्या उद्यानातील अँफी थिएटरमध्ये सादर होतील. सर्व कार्यक्रम दररोज सायंकाळी ६.३० वाजता सुरु होणार आहेत. कोरोनाच्या या काळात महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आसन क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देऊन फिजिकल डिस्टन्सिंग पाळून कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. त्यादृष्टीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे.
यासोबत पद्मश्री डॉ. भंवरलाल जैन यांच्या जयंतीनिमित्त भाऊंच्या विचारांवर आधारीत चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. लॅब, लॅण्ड व लायब्ररी या विषयावर शालेय आणि खुल्या गटासाठी ही चित्रकला स्पर्धा होणार आहे. स्पर्धकांनी आपली चित्रे १२ डिसेंबरपर्यंत कलाशाळा, त्रिमुर्ती आर्ट मिनाताई ठाकरे कॉम्पलेक्स, श्री ड्रॉइंग क्लासेस एसएमआयटी रोड, जळगाव येथे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.