विद्यापीठाचे नवीन शैक्षणिक वेळापत्रक जाहीर

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता प्रथम व द्वितीय सत्र प्रारंभ व शेवट याबाबतचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता प्रथम व द्वितीय सत्र प्रारंभ व शेवट याबाबत वेळापत्रक जाहीर केले आहे. कोरोना संसर्गामुळे तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार शैक्षणिक सत्रात बदल करण्यात आला आहे. यानुसार द्वितीय वर्ष व त्यापुढील वर्षाचे प्रथम सत्र हे १ ऑगस्ट २०२० ते २५ जानेवारी २०२१ दरम्यान राहील. यात १२ ते १८ नोव्हेंबर दिवाळीची सुटी असेल. पुढील सत्रारंभाची पूर्व तयारी २६ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२१ असेल. द्वितीय सत्र हे १० फेब्रुवारी ते २५ जुलै २०२१ राहील. तर पुढील सत्रारंभाची पूर्व तयारी २६ जुलै ते ७ ऑगस्ट २०२१ राहील. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे प्रथम सत्र १ नोव्हेंबर २०२० ते २७ मार्च २०२१ पर्यंत राहील. यात १२ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर २०२० दिवाळीची सुटी राहील. पुढील सत्रारंभाची पूर्व तयारी २८ मार्च ते ४ एप्रिल २०२१, द्वितीय सत्र ५ एप्रिल ते २१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत राहील. तर पुढील सत्रारंभाची पूर्व तयारी ही २२ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट दरम्यान राहणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे.

दरम्यान, शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जरी जाहीर झाले असले तरी कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत व महाराष्ट्र शासन, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना प्राप्त होईपर्यंत शिक्षण ऑनलाइन पद्धतीनेच सुरु ठेवावे, असे आदेश महाविद्यालयांना देण्यात आले आहेत.

Protected Content