जळगाव प्रतिनिधी । आजवर वेळेचे बंधन पाळून आठवड्यातील पाच दिवस दुकाने सुरू होती. मात्र आता जिल्हाधिकार्यांनी जारी केलेल्या निर्देशांनुसार आजपासून सातही दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ या कालावधीत बाजारपेठ खुली राहणार आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत जळगावची बाजारपेठ पूर्णपणे बंद होती. तर नंतर आठवड्यातील पाच दिवस सकाळी नऊ ते सायंकाळी सात या कालावधीत दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली होती. कोरोना विषणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय या प्रकारचे निर्बंध टाकण्यात आले होते.
दरम्यान, सर्वत्र मिशन बिगीन अगेन सुरू झाले असतांना व्यापार्यांनी सातही दिवस दुकाने खुली करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी राऊत यांनी बुधवारी महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी १५ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. यामागे मार्केट्स, दुकानांमधील गर्दी कमी करणे, गर्दीवर नियंत्रण आणणे हा उद्देश असल्याचे म्हटले आहेे.
दरम्यान, आजपासून जिल्हाभरातील सर्व शासकीय व खासगी ग्रंथालये फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून सुरू होणार आहेत. बगीचे, पार्क व सार्वजनिक जागेतील ठिकाणे मनोरंजनासाठी सुरू ठेवली जाणार आहेत. व्यवसाय ते व्यावसायीकांकरीता प्रदर्शन हे प्रतिबंधित क्षेत्र वगळून सुरू करता येणार आहेत. गुरुवारपासून जिल्हाभरातील आठवडे बाजार सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत यांनी सुचनांचे पालन करून तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत.