अतिवृष्टीचा महावितरणला फटका : मनोरे व खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज स्पेशल रिपोर्ट | बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदसह परिसराला शनिवारी अतिवृष्टीने अक्षरश: झोडपून काढले. यात महावितरणाला देखील मोठा फटका पडल्याचे दिसून आले आहे.

( Image Credit Source : Live Trends News )

बुलडाणा जिल्ह्याातील जळगाव जामोद परिसरात झालेल्या पावसाच्या तांडवाचा मोठा फटका वीज यंत्रणेला बसला आहे. बाळापूर – जळगाव जामोद या १३२ केव्ही अतीउच्चदाब वाहिनीचा लोकशन नं १४७ वा मनोरा पावसामुळे जमिनदोस्त झाल्याने १३२ केव्ही जळगाव जामोद या अती उच्चदाब उपकेंद्रासह महावितरणच्या ३३/११ केव्हीच्या ४ उपकेंद्राचा वीज पुरवठा बाधित झाला आहे.वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू झाले असल्याची माहिती अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी दिली आहे.

दरम्यान, १३२ केव्ही अतीउच्चदाब बाळापूर उपकेंद्रातून १३२ केव्ही जळगाव जामोद या अतीउच्चदाब उपकेंद्राला वीज पुरवठा करण्यात येतो.त्यांनतर १३२ केव्ही जळगाव जामोद या उपकेंद्रावरून महावितरणच्या ३३ केव्ही उमापूर,३३ केव्ही जळगाव जामोद,३३ केव्ही जळगाव आयपीडीएस आणि ३३ केव्ही जामोद उपकेंद्राला वीज पुरवठा होतो.परंतू बाळापूर- जळगाव जामोद या महापारेषणच्या अतीउच्चदाब वाहिनीवरील १४७ क्रमांकाचा मनोरा पावसामुळे जमिनदोस्त झाल्याने १३२ केव्ही जळगाव जामोदसहीत महावितरणच्या चार उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.

यासोबत महावितरणच्या ३३ केव्ही उमापूर ,जळगाव जामोद, जळगाव आयपीडीएस आणि ३३ केव्ही जामोद उपकेंद्रातून जळगाव जामोद व संग्रामपूर उपविभागातील ४८ गावांना वीज पुरवठा होतो. त्यामुळे या उपकेंद्रातून वीज पुरवठा करण्यात येत असलेली १२ हजार ७७० ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला आहे. पावसाचा जोर एवढा जास्त होता की जळगाव आणि संग्रामपूर परिसरात महावितरणचे जवळपास ७ रोहित्राचे स्ट्रक्चर हे पुरात वाहून गेले आहे. तर अनेक रोहित्राचे संपूर्ण स्ट्रक्चर जमिनीला भिडले आहे.

त्यासोबतच ३३ केव्ही वीज वाहिन्यांचे अनेक पोल वाहून गेले असुन बरेच खांब खाली पडले आहे.त्यामुळे वीज वाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.महावितरणचे दुरूस्ती कार्य सुरू आहे.याशिवाय इतर नजिकच्या उपकेंद्रातून वीज पुरवठा सुरू करता येते का ? याचीही चाचपणी सुरू आहे. परंतु संपूर्ण परिसरच जलमग्न झाले असल्याने शोध कार्याला आणि दुरूस्ती कार्याला अडथळा निर्माण होत आहे.

तर, दुसरीकडे, पावसाचे रौद्र रूप बघता जिल्ह्यातही आणखी बर्‍याच ठिकाणी वीज यंत्रणा बाधीत झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.जिल्ह्यातील संपूर्ण वीज परिस्थितीवर मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर आणि अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके लक्ष ठेवून आहे.कार्यकारी अभियंते , उपविभागीय अभियंतासह महावितरणची यंत्रणा फिल्डवर आहे.या काळात वीज ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन अधिक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी केले आहे.

Protected Content