जळगाव प्रतिनिधी । शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हे निविदेत नमूद असलेल्या गुणवत्ता व दर्जाच्या मानकाप्रमाणे होत नसून या कामाची गुणवत्ता त्रयस्थ अशासकीय संस्थेकडून तपासण्याची मागणी ‘जळगाव फर्स्ट’ या संस्थेतर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा
जळगाव फर्स्ट या संस्थेतर्फे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांना निवेदन देऊन महामार्गाच्या कामाबाबत तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी ‘जळगाव फर्स्ट’चे डॉ.राधेश्याम चौधरी, ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी व गजानन मालपुरे यांची उपस्थिती होती.
जळगाव फर्स्टद्वारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्ग क्र.६ चे चौपदरीकरण व समांतर रस्ते विकसित करण्याचे काम जांडू कंपनीद्वारे सुरू आहे. हजारो अपघात, शेकडो जळगावकरांचे बळी या महामार्गावर गेले. अनेक वर्षांच्या आंदोलनानंतर हे काम केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयांतर्गत नहीच्या देखरेखीखाली सुरू आहे. या कामाचे अवलोकन केले असता कामाच्या सध्यस्थितीबद्दल अनेक त्रुटी, तक्रारी, उणिवा नजरेसमोर येत असल्याचे यात म्हटले आहे.
यात पुढे नमूद केले आहे की, महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी जे वळण रस्ते आहेत तेथे डांबरीकरण नाही. यामुळे या भागात धूळ उडत असून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पाणी मारले जात नाहीत. रिफ्लेक्टर बसवण्यात आलेले नाहीत. रस्त्यावर भराव मुरूम, खडी ऐवजी मातीचा भरावासाठी वापर केलेला दिसतो. रस्त्यांचे, भुयारी मार्गाच्या काँक्रिटची गुणवत्ता, दर्जा हे देखील निविदेत नमूद केलेल्या दर्जाचे नाही.
महामार्गाच्या कामातील त्रृटींमुळे पाच लाख जळगावकरांच्या सुरक्षिततेच्या, जिव्हाळ्याच्या या कामात प्रचंड अनियमितता, उणिवा दिसून येतात. या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातून जाणार्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची गुणवत्ता, दर्जा त्रयस्थ अशासकीय संस्थेद्वारा तपासाव्यात. संपूर्ण काम हे निविदेत नमूद केल्याप्रमाणे होत आहे की नाही, याबद्दल चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.