जळगाव प्रतिनिधी । बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी सीए महावीर जैन आणि धरम सांखला यांच्या अर्जावर ११ रोजी तर विवेक ठाकरेच्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, यात अटक असलेला कंडारेचा वाहनचालक कमलाकर कोळी याला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २७ नोव्हेंबर रोजी जळगावात छापेमारी केल्यानंतर अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त केले. तसेच सीए महावीर जैन, विवेक ठाकरे, धरम साखला, सुजीत बाविस्कर (वाणी) व कमलाकर कोळी या पाच जणांना अटक केली होती. हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, पुणे विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्या न्यायालयात मंगळवारी कोळी व बाविस्कर यांच्या जामिनावर युक्तिवाद झाला. बाविस्कर हा कंडारेचा अत्यंत महत्त्वाचा माणूस आहे, त्याच्या घरात बीएचआरच्या संदर्भातील मूळ निविदा मिळून आल्या आहेत. त्यामुळे त्यालादेखील माहिती असल्यामुळे जामीन देऊ नये अशी हरकत सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण व ठेवीदारांच्या हजर झालेल्या त्रयस्थ अर्जदार अॅड. अक्षता नायक यांनी घेतली होती. या प्रकरणात कोळी किंवा बाविस्कर यांना कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही. पोलिसांनी यापूर्वीच तीन ट्रक भरून कागदपत्र जप्त केले आहेत. त्यामुळे आता नव्याने तपास करण्यासाठी पोलिसांकडे काही शिल्लक नाही. तेव्हा अटकेतील दोन्ही संशयितांना जामीन मंजूर करावा असा युक्तिवाद त्यांचे वकील अॅड. उमेश रघुवंशी यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कोळी याला जामीन मंजूर केला. तर बाविस्कर याच्या जामिनावर ११ जानेवारी रोजी ऑर्डर करण्यात येणार आहे.
तर, याच प्रकरणात अटकेत असलेले विवेक ठाकरेच्या जामिनावर बुधवारी सुनावणी होणार आहे. तर सीए महावीर जैन व धरम साखला या दोघांच्या जामीन अर्जावर ११ रोजी युक्तीवाद होणार आहे.