जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील धानवड येथील रहिवासी, माजी जि.प. सदस्य, बाजार समिती सभापती व विकासो चेअरमन तथा गेल्या तीन दशकांपासूनचे माझे निष्ठावंत सहकारी रावसाहेब पाटील यांच्या निधनाने मी माझ्या कुटुंबातील एक सदस्य गमावला असल्याची संवेदना राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.
तालुक्यातील धानवड येथील रहिवासी तथा माजी जि.प. सदस्य, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा धानवड विकासोचे चेअरमन रावसाहेब पाटील यांचे आज पहाटे मुंबई येथे उपचार घेत असतांना निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता येताच राजकीय आणि सामाजिक वर्तुळावर शोककळा पसरली. ते ना. गुलाबराव पाटील यांचे प्रदीर्घ काळापासूनचे सहकारी असल्याने गुलाबभाऊंनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, रावसाहेब पाटील आणि आमचा स्नेह हा सुमारे तीन दशकांचा होता. माझे निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांनी केलेले सामाजिक काम अविस्मरणीय असेच आहे. मध्यंतरी त्यांना किडनीच्या विकाराने ग्रासल्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार केले. या उपचारांना प्रतिसाद मिळाल्याने ते बरे देखील झाले. मात्र अचानक २ दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी आज मुंबई येथिल जसलोक हॉस्पिटलमध्ये शेवटचा श्वास घेतला. रावसाहेब हे कट्टर शिवसैनिक ! बाळासाहेब ठाकरे यांचा प्रखर हिंदुत्ववादी विचारांना प्रमाण मानून त्यांनी वाटचाल केली. आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रावसाहेब आणि त्यांचे सुपुत्र शिवराज यांनी दोघांनी आमची साथ दिली. त्यांच्या निधनाने मी एक सच्चा सहकारी गमावला असून परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो हीच प्रार्थना ! असे गुलाबभाऊ म्हणाले.
पार्थिव सायंकाळी एयर अँब्युलन्सने येणार
शिवसेनेचे जळगाव जिल्हा उपजिल्हाप्रमुख रावसाहेब माधवराव पाटील यांचे आज अल्पशा आजाराने मुंबई येथे जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले. वैदकीय कारणामुळे त्यांच्या पार्थिवावर लवकरात लवकर अंत्यसंस्कार होणे आवश्यक होते. ही बाब पाणीपुरवठा व स्वछता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांना कळताच त्यांनी माननीय मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सदर पार्थिव मुंबईहून जळगावला आणण्यासाठी एअर अँबुलन्स उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली असता मा.मुख्यमंत्री यांनी त्वरित मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना निर्देश दिले. त्यांनीं तत्काळ एअर अँबुलन्स उपलब्ध करून दिली. पाणीपुरवठा व स्वछता मंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.गणेश बढे यांनी सकाळपासून जसलोक हॉस्पिटलमध्ये थांबून सर्व समनव्य साधला. रावसाहेब पाटील यांचे पार्थिव संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जळगाव येथे पोहोचणार असून संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या पार्थिवावर धानवड येथे अंत्यसंस्कार होतील.