जळगाव प्रतिनिधी । उपप्रादेशिक परिवहन मंडळात कार्यरत कनिष्ठ लिपीकाने वरिष्ठ अधिकार्यांची बनावट स्वाक्षरी करून २.३८ लाख रूपयांचा अपहार केल्याने उघडकीस आल्याने रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरटीओ विभागात कनिष्ठ लिपिक पदावर काम करणार्या कर्मचार्याने थेट वरिष्ठ अधिकार्यांचे बनावट आदेश, सह्यांचा वापर करून २ लाख ३८ हजार १०० रुपयांचा अपहार केला. ऑगस्ट २०१९ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत हा अपहार झाला आहे. या प्रकरणात लिपिकासह पंटर व वाहनचालक असे एकूण ४३ जणांवर ६ नोव्हेंबर रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागेश पाटील हे ऑक्टोबर २०१८ पासून वायुवेग पथकात काम करीत होते. त्यांच्यावर विविध गुन्ह्यात अटकाव करून ठेवलेल्या वाहनांची चौकशी करून शासनाच्या नियमाप्रमाणे दंड वसूल करण्याची जबाबदारी होती. पाटील हे सप्टेंबर २०१९मध्ये खटला विभागात काम करीत होते. या वेळी याच पथकातील श्रीकांत महाजन यांनी एसटी वर्कशॉप परिसरात मन्सूर खान मेहबूब खान यांचे एमएच १९, बीएम ५९९५ वाहन अडवले होते. या वेळी नागेश पाटील यांना कोणताही अधिकार नसताना त्यांनी कॅश ऑनरोड पद्धतीचा वापर करून खान यांच्याकडून खोटे ई-चलनद्वारे ३ हजार १०० रुपये दंड वसूल केला. यासाठी त्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांऐवजी स्वत: स्वाक्षरी केली.
या घटनेनंतर काही दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला. यामुळे ११ जानेवारी २०२० रोजी पाटील यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. एका समितीने ही चौकशी केली. यात पाटील यांनी अपहार केल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर पाटील यांच्या संपूर्ण काळातील चौकशी केली असता त्यांनी एका महिन्यात २ लाख ३८ हजार १०० रुपयांचा अपहार केल्याचे दिसून आले.
या अनुषंगाने वरिष्ठ लिपिक प्रकाश रामराव पाटील (वय ५७, रा. नेहरूनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागेश पाटील यांच्यासह पंटर व वाहनमालक अशा ४३ जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात अपहार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.