जळगाव प्रतिनिधी । प्लॉट खरेदीत १२ जणांची १ कोटी ४८ लाख ९७ हजार ७०४ रुपयांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
डॉ. उल्हास यशवंत बेंडाळे, निर्मला उल्हास बेंडाळे व विनायक यशवंत बेंडाळे (रा.रिंगरोड, जळगाव) या तिघांविरूध्द जिल्हा पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी पिंप्राळ्यातील गट क्रमांक २१०, २१४ व २१६ मधील जमिनीत प्लॉट पाडून ते एन.ए. झालेले नसताना एकूण २६५ प्लॉट पाडले. लोकांना ४२ हप्त्यांचे योजनेप्रमाणे विक्री केलेले आहेत. हे प्लॉट शरीफ पिंजारी यांच्या मध्यस्थीने बुक करून विक्री केले. पिंप्राळा हुडकोतील अब्दुल रहिम दगडू काझी (वय ४४) व अन्वर शेख रहेमान यांनी ७० रुपये चौरस फूट प्रमाणे प्लॉट बूक केला होता. त्यापोटी दोघांनी एकूण १२ लाख ३३ हजार रुपये हप्त्याने भरणा केला होता.
मात्र बेंडाळेंनी तो प्लॉट दुसर्याला विक्री केला. त्या बदल्यात दुसरा प्लॉट ठरलेल्या भावापेक्षा ६ लाख १७ हजार रुपये जास्त घेऊन खरेदी करून दिला. त्याचप्रमाणे अहेमद युसूफ खान, रोशन अहेमद पिंजारी, शेख गुलाब इब्राहीम, शेख फारुख शेख गणी, नसरिन युसूफ खान, शेख साबीर शेख वजीर,मुकीम तस्लीम खान, सलिम शेख अमिर, अल्ताफ शेख हमीद, परवीनबी अलिम शेख, साबीराबी वहाब खाटीक,अब्दुल रहिम दगडू काझी आदी १२ जणांनी बुक केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम घेतली. यशवंत हॉस्पिटलच्या लेटर हेडवर लिहून दिलेल्या भरणा केलेल्या रकमेचे विवरणपत्र दिले. माजी नगरसेवक शरीफ पिंजारी यांच्या स्वाक्षर्या असलेल्या मूळ प्रती स्वत:कडे ठेवल्या. या बारा जणांकडून १ कोटींवर रक्कम घेतली. प्लॉट खरेदी करून न देता फसवणूक केल्याची फिर्याद अब्दुल रहीम काझी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात दिली आहे.
यानुसार, डॉ. उल्हास यशवंत बेंडाळे, निर्मला उल्हास बेंडाळे व विनायक यशवंत बेंडाळे (रा.रिंगरोड, जळगाव) या तिघांविरूध्द जिल्हा पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.