जळगाव प्रतिनिधी । जिल्हा दूध संघात कोट्यवधी रूपयांचा घोळ झाला असून आपण दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास करण्याऐवजी संघातील १९७५ ते २००० पर्यंतची कागदपत्रे कोणतीही पूर्वसूचना न देता जाळून टाकण्यात आल्याचा धक्कादायक आरोप माजी सुरक्षाधिकारी नगराज पाटील यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला. एकनाथराव खडसे व त्यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांचा या अपहारात समावेश असल्याचा दावा त्यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
जिल्हा दूध संघाचे माजी सुरक्षा अधिकारी नगराज पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दूध संघातील भ्रष्टाचाराबद्दल खळबळजनक आरोप केले. ते म्हणाले की, जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ, जळगाव या संस्थेत सन १९८८ ते १९९९ पर्यंत मी मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून काम करीत होतो. यानंतर जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या विरोधात मी पोलीस ठाण्यात विविध तक्रारी केल्या असून न्यायालयीत व्यवस्थेत १८ याचिकांवर सुनावणी सुरू असल्याची माहिती एन.जे. पाटील यांनी दिली.
श्री पाटील पुढे म्हणाले की, जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या विद्यमान संचालकांची कार्यकाळाची २०२० मध्ये संपलेली आहे. मात्र राज्य सरकारने तेथे प्रशासकाची नेमणुक न करता विद्यमान चेअरमन सौ.मंदा एकनाथ खडसे व इतर संचालकांना राजकीय दबावातून मुदत वाढ दिलेली आहे. राज्यभरातील ज्या- ज्या ग्रामपंचायतींच्या लोकनियुक्त कार्यकाळी मंडळाची मुदत संपली तेथे प्रशासकाची नियुक्ति राज्य सरकारने केलेली आहे. मात्र जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात अद्यापही प्रशासक नेमलेला नाही.
सध्याच्या चेअरमन सौ.मंदा एकनाथ खडसे यांच्या कार्यकाळात घड़लेल्या विविध प्रकारच्या सात गैरप्रकरणांच्या तक्रारी पोलीस व याचिका न्यायालयात मी केलेल्या आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सात पैकी केवळ दोन मुद्यांच्या उल्लेख मी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, सन २०१४ मध्ये खडसे यांच्याकडे कृषी व दुग्ध विकास मंत्रालयासह इतर बारा खात्यांचे मंत्रीपद होते. एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सुध्दा होते. त्यामुळे एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात झालेल्या जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक आणि जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ निवडणूकीत भाजपाने वर्चस्व मिळविले. कृषी व दुग्ध विकास खाते एकनाथ खडसे यांच्याकडे असल्याने जिल्हा बँक व जिल्हा दूध संघ यांचा विकास होईल असे वाटत होते. तथापि, असे झाले नाही.
एन.जे. पाटील म्हणाले की, सौ. मंदा एकनाथ खडसे यांच्या कार्यकाळात दूध संघातील महत्वाचे रेकॉर्ड जाळून टाकण्यात आले आहे. जिल्हा सहकारी दूध संघाचे सन १९७५ ते २००० पर्यंतचे सर्व रेकॉर्ड मंदा एकनाथ खडसे यांच्या काळात जाळून टाकण्यात आले आहे. या कारवाईसाठी महाराष्ट्र शासन, पोलीस विभाग आणि न्यायालयाची परवानगी घेण्यात आलेली नाही.
जळगाव जिल्हा दूध संघाचा ताबा सन १९९५ ते २०१२ दरम्यान एनडीडीबीकडे होता. एनडीडीबीने या काळात दूध संघात काम केले. त्यात अनेक प्रकारचे गैरनिर्णय घेतले. या विषयी आपण स्वतः मूख्य न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात फौजदारी अर्ज केला. दि. ३/१०/२०१३ रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाला अनुसरून दि. १३/१२/२०१३ ला जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार (१८२/२०१३) दाखल केलेली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तर हीच कागदपत्रे जाळून टाकण्यात आल्याने सर्व कागदोपत्री पुरावे नष्ट झाल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, एन.जे. पाटील पुढे म्हणाले की, सौ. मंदा खडसे चेअरमन होत असतांना जळगाव जिल्हा दूध संघावर कोणत्याही वित्तीय संस्थेचे एक रूपयाचे कर्ज नव्हते. उलट जिल्हा दूध संघाच्या ठेवी इतर बँकांमध्ये होता. दि.
३१/३/२०१९ अखेरचा ताळेबंद बघितला असता जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघावर साठ कोटी रूपयांपेक्षा जास्त कर्ज असल्याचे दिसते. या बरोबरच माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा राज्य सरकारवरील प्रभावाचा वापर करून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांतून सुमारे ५७ कोटी रूपयांचे अनुदान घेतलेले दिसते. याचाच अर्थ कर्ज आणि अनुदान स्वरूपाचील ११७ कोटी रूपयांमध्ये विद्यमान चेअरमन सौ. मंदा एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या असा कोणता विकास केला? हा प्रश्न जाहीरपणे मी विचारत असून त्यावर त्यांनी व त्यांच्या अधिकार्यांनी खुलासा करावा अशी माझी मागणी आहे.
आपण लवकरच पाच अन्य मुद्यांवरून पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती सुध्दा एन.जे. पाटील यांनी याप्रसंगी दिली.
खालील व्हिडीओत पहा एन.जे. पाटील यांनी या प्रकरणी दिलेली संपूर्ण माहिती.
https://www.facebook.com/508992935887325/videos/176001260908833