जळगावात उद्या खान्देश स्तरीय लोक कलावंत विचार परिषद ( व्हिडीओ )

जळगाव संदीप होले । कोरोनाच्या आपत्तीमुळे लोक कलावंतांवर मोठ्या प्रमाणात अरिष्ट आलेले आहे. त्यांच्यासाठी हा अतिशय कठीण असा कालखंड आहे. या अनुषंगाने कलावंतांच्या विविध समस्यांमधून मार्ग काढण्यासाठी आणि काही महत्वाच्या विषयांना मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनाने उद्या दिनांक ८ नोव्हेंबर रविवारी खान्देश स्तरीय लोक कलावंत विचार परिषद होत आहे. अ.भा. शाहिर परिषदेचे विभागीय अध्यक्ष तथा या परिषदेचे निमंत्रक विनोद ढगे यांनी याबाबत विस्तृत माहिती दिली.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या विशेष सहकार्याने अखील भारतीय लोक कलावंत तमाशा परिषद, अखील भारतीय शाहीर परिषद आणि केशवस्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने खान्देश लोक कलावंत विचार परिषद-२०२० चे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात रविवार दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. याबाबत माहिती देतांना अखील भारतीय शाहिर परिषदेचे विभागीय अध्यक्ष विनोद ढगे म्हणाले की, कोरोनाच्या संकट काळात खान्देशी लोककला व लोक कलावंतांवर मोठा आघात झाला आहे. तमाशा, शाहिरी, गोंधळ, वाघ्या-मुरळी, वही गायन, सोंग, सोंगाड्या पार्टी आधी लोककला प्रकारात काम करणार्‍या व लोक कलेचे जतन व संवर्धन करणार्‍या अंदाजे पाच हजार लोक कलावंतांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. कोरोनामुळे आलेल्या संकटाने पुढील काळात खानदेशी लोक कलेचे जतन व संवर्धन करणे हे खूप मोठे आव्हान आपल्यासमोर असणार आहे.

विनोद ढगे पुढे म्हणाले की, या परिस्थितीचा विचार करून लोककलेच्या जतन व संवर्धन करण्यासाठी लोककलावंतांना आत्मनिर्भर करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र सर्वात पहिल्या खान्देश स्तरीय लोककलावंत विचार परिषदेचे आयोजन रविवार दिनांक ८ नोव्हेंबर २० २४ रोजी करण्यात येत आहे. अखिल भारतीय मराठी तमाशा परिषद व अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद यांच्या पुढाकाराने व केशव स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त सहकार्याने ही परिषद होत आहे. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री. ढगे पुढे म्हणाले की परिषदेसाठी तमाशा परिषद व शाहीर परिषद यांचे राज्यांचे मान्यवर पदाधिकारी यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील तमाशा शाहिरी, गोंधळ, वाघ्या-मुरळी, वही गायन, सोंग, सोंगाड्या पार्टी आदी लोककला प्रकारात काम करणारे व खानदेशातील लोक कलेचे जतन संवर्धन करणारे लोक कलावंत सहभागी होणार आहेत. या विचार परिषदेच्या माध्यमातून कोरोना व कोरोनाच्या नंतरच्या जगामध्ये लोक कलेचे जतन व संवर्धन करण्याच्या महत्त्वपूर्ण विषयांवर विचार परिषदेत ठराव संमत करण्यात येणार आहे. यात शासकीय स्तरावरून कलावंतांना मदत मिळावी, जळगावात लोककला भवन तर अमळनेरात तमाशा भवन उभारण्यात यावे आदींसह अन्य मागण्यांचा समावेश आहे.

या कलावंत विचार परिषदेसाठी जिल्ह्यातील लोककलावंतांनी सहभागी व्हावे असे आवाहन शाहीर परिषदेचे विभागीय अध्यक्ष तथा या विचार परिषदेचे निमंत्रक विनोद ढगे व तमाशा परिषदेचे उपाध्यक्ष शेषराव नाना गोपाळ यांनी केले आहे.

खालील व्हिडीओत पहा विनोद ढगे यांनी आयोजनामागची विशद केलेली भूमिका.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1326361901062160

Protected Content