जळगाव प्रतिनिधी । मंत्री यशोमती ठाकूर यांचा राजीनामा घेण्याआधी भाजपने घरकूल प्रकरणात शिक्षा झालेल्या आपल्या महापालिकेतील पाच नगरसेवकांचे आधी राजीनामे घ्यावेत असा खोचक सल्ला विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी दिला आहे.
भाजपकडून महाविकास आघाडीतील बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना शिक्षा झाल्याने राजीनामा मागितला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. परंतु भाजपच्या जळगाव महापालिकेतील ५ नगरसेवकांना घरकुल प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. भाजपने आधी आपल्या नगरसेवकांचे राजीनामे घ्यावेत त्यानंतर मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करावी असे आव्हान विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी दिले आहे.
यासंदर्भात सुनील महाजन यांनी जळगावातील भाजपच्या ५ नगरसेवकांना धुळे न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावल्याची आठवण करून दिली आहे. शिक्षेनंतर अजूनही पाचही नगरसेवकांनी राजीनामा दिलेला नाही. तसेच पक्षाच्यावतीने देखील राजीनाम्याची मागणी केलेली नाही. यामुळे भाजपने आधी जळगाव महापालिकेतील आपल्या त्या पाच नगरसेवकांचा राजीनामा घ्यावा असा खोचक सल्ला सुनील महाजन यांनी दिला आहे.