जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात असणार्या रेणुका नगरात आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत छतावरील शेेडमध्ये असणार्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यामुळे येथे आपल्या दोन मुलांसह राहणार्या निराधार महिलेचा संसार उघड्यावर आला आहे.
याबाबत वृत्त असे की, रेणुकामाता नगरात असलेल्या भीकन निंबा चौधरी यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर असणार्या पार्टीशनच्या घराला आज सकाळी अकस्मात आग लागली. यात शेड जळून खाक झाले. यामध्ये एक महिला आपल्या दोन मुलांसह राहते. तिच्या घरातील वस्तूंची अक्षरश: राख झाली आहे.
या शेडमध्ये रेखा पिंटू भालेराव ही महिला आपल्या दोन मुलांसह अलीकडेच राहण्यासाठी आले होते. या महिलेचे पती वारले असून ती एकटीच आपल्या दोन्ही मुलांसह या पार्टीशनयुक्त घरामध्ये वास्तव्यास होती. ही महिला बांधकाम कामगार असून भल्या पहाटे गाडेगाव येथे काम करण्यासाठी गेली होती. ती महिला गाडेगावला पोहचत नाही तोच तिच्या शेजारच्यांनी फोन करून तिला तिच्या घराला आग लागल्याची माहिती दिली. यानंतर ही महिला तातडीने घरी आली. आपले घर जळून खाक झाल्याची दिसताच त्या महिलेला भोवळ आली. परिसरातील नागरिकांनी तिला धीर दिला.
दरम्यान, आज सकाळी घरातून आगीचे लोळ येतांना पाहून परिसरातील लोकांनी अग्नीशामन दलाच्या पथकाला पाचारण केले. महापालिकेच्या पथकाने आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र दरम्यान, येथे राहणार्या महिलेच्या घरातील जीवनोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती पहिल्यांदा समजली नाही. मात्र मीटरच्या वर असणार्या विजेच्या तारेमुळे शॉर्ट सर्कीट होऊन आग लागल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, आजच्या आगीत रेखा भालेराव या निराधार महिलेचा संसार उघड्यावर आला आहे. आधीच अत्यंत कष्टमय आयुष्य जगत असलेल्या या स्त्रीच्या आयुष्यावर पुन्हा आपत्ती कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्षा मनीषा पाटील यांनी त्यांना तातडीने पाच हजार रूपयांची मदत केली आहे. या महिलेस शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
खालील व्हिडीओत पहा या दुर्घटनेचा वृत्तांत.
https://www.facebook.com/watch/live/?v=1206792259759106&ref=watch_permalink