जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज जिल्हा कारागृहात चार कैद्यांमध्ये नाश्त्याच्या प्रसंगी झालेल्या वादातून तुंबळ हाणामारी झाली असून या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव जिल्हा कारागृहात असलेल्या चार कैद्यांमध्ये नास्त्यावरून झोंबाझोंबी झाल्याची घटना शुक्रवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता घडली. सतीश मिलिंद गायकवाड, करण युवराज पवार, अर्जून युवराज पवार, विलास चंद्रसिंग पठाण असे कैद्याची नावे आहेत. जळगाव जिल्हा कारागृहात शुक्रवारी २६ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वाजता कैद्यांना मोजणी करून सर्कल परिसरात मोकळे सोडण्यात आले होते. सकाळी ७ वाजेच्या सुमारास कैदी करण पवार हा नाश्ता वाटप करीत होता. त्यावेळी डबल नास्ता दिला नाही म्हणून कैदी सतीश गायकवाड व करण पवार यांच्या जोरदार वाद झाला.
यानंतर सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास सतीश गायकवाड हा मुलाखत विभाग येथून त्याच्या बॅरेक क्र. ४ कडे जात होता. त्यावेळी करण व त्याचे साथीदार बंदी विलास पठाण व अर्जून पवार यांनी सतीशला थांबवून त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर वाद उफाळून त्यांनी परस्परांना शिविगाळ केली. आणि दुसर्याच क्षणी चौघांमध्ये हाणामारी झाली. हा प्रकार वरिष्ठ तुरूंग अधिकारी गजानन पाटील, तुरूंग अधिकारी राकेश देवरे, पोलीस शिपाई गजानन चव्हाण व इतर बंद्यांच्या लक्षात येताच त्यांनी भांडण सोडविले.
दरम्यान, या हाणामारीत करण पवार याच्या डाव्या पायाला व डाव्या हाताच्या बोटाला इजा झाली. तर सतीशच्या तोंडाला मुका मार लागला. या प्रकारानंतर सायंकाळी तुरूंग अधिकारी राकेश देवरे यांनी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार हाणामारी करणार्या चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.