जळगाव प्रतिनिधी । जैन उद्योग समूहाचे संस्थापक दिवंगत भवरलालभाऊ जैन यांच्या तब्बल १८ हजार चौरस फुटात पाईपच्या आधारे साकारलेल्या चित्राची जागतिक विक्रम म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये नोंद करण्यात आली आहे.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड कंपनीचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त त्यांचे १८ हजार चौरस फूट आकाराचे व्यक्तिचित्र तयार करण्यात आले आहे. जैन कंपनीतील पीई आणि पीव्हीसी पाइप्सच्या माध्यमातून मोजेक कला प्रकारात तयार करण्यात आलेल्या या चित्राची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे. जैन इरिगेशन कंपनीतील प्रदीप भोसले यांनी ही १५० फूट लांब आणि १२० फूट रूंद कलाकृती साकारली असून त्यासाठी त्यांना सात दिवस एकूण ९८ तास काम करावे लागले.
भवरलालभाऊ जैन यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेच्यावतीने नाशिक येथील स्वप्निल डांगरीकर यांनी हा जागतिक विक्रम असल्याचे प्रमाणपत्र दिले. त्यांच्या समवेत पुण्याचे निखिल शुक्ल यांची गिनिज बुकने प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी ही संपूर्ण निर्मिती ऑनलाईन पाहिली.
ही कलाकृती बनवण्यासाठी ३० टन वजनाचे १० हजार पाइप्स लागले. ते एकमेकांना जोडले तर त्यांची लांबी २१.९ कि.मी. होते. काळा, करडा आणि पांढरा रंग असलेले पाइप त्यासाठी वापरले गेले. जळगाव येथील आर्किटेक्ट शिरीष बर्वे यांनी तांत्रिक आणि भौतिक बाबींचे सर्वेक्षण करून कंपनीला प्रमाणित करून दिले. प्राचार्या शिल्पा बेंडाळे आणि चित्रकार सचिन मुसळे हे निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. दरम्यान, जैन व्हॅलीत भाऊंची सृष्टी नावाने साकारलेल्या जागेत ही कलाकृती कायमस्वरुपी पाहाता येईल, असे जैन इरिगेशन कंपनीचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी जाहीर केले आहे.