जळगाव प्रतिनिधी । एकीकडे भाजपमधील एक मोठा गट शिवसेनेसोबत असल्याचे स्पष्ट झाले असतांना माजी महापौर ललीत कोल्हे यांनी देखील शिवसेनेसोबत जाण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत भाजपला धक्का दिला आहे.
जळगाव महापालिकेची महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक जवळ आली असतांना शिवसेनेने भाजपच्या मोठ्या गटास गळाला लावले आहे. रात्री उशीरा भाजपचे नगरसेवक हे शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकार्यांसोबत अज्ञात स्थळी रवाना झाले. यात दुपारपर्यंत माजी महापौर ललीत कोल्हे हे भाजपसोबतच असल्याचे चित्र होते. तर रात्री त्यांनी आपली भूमिका बदलून आपण शिवसेनेसोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे शिवसेनेच्या सत्तेच्या दाव्याला अजून बळकटी मिळाली आहे.
ललीत कोल्हे हे जळगावच्या राजकारणातील मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जाते. आता ते स्वत: शिवसेनेला जाऊन मिळाल्याने भाजपला मोठा धक्का तर बसणारच आहे, पण शिवसेनेला याचा लाभ होण्याची शक्यता आहे. तर कोल्हे यांचे समर्थक नगरसेवक देखील हाच कित्ता गिरवण्याची शक्यता आहे. अर्थात, यामुळे भाजपच्या अडचणींमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
जळगाव महापालिकेत भाजपला तब्बल ५७ जागा मिळाल्या असून या खालोखाल शिवसेनेला १५ तर एमआयएमला तीन जागा मिळाल्या होत्या. आता १८ मार्च रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपमधील एका मोठ्या गटाला गळास लावले आहे. शिवसेनेने महापौरपदासाठी सौ. जयश्री सुनील महाजन तर उपमहापौरपदासाठी भाजपचे फुटीर सदस्य कुलभूषण पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर भारतीय जनता पक्ष आज आपले पत्ते उघड करण्याची शक्यता आहे. अर्थात, आज दिवसभरात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.