जळगाव संदीप होले । बीएचआर प्रकरणात कुणी नेत्याने बारामतीला जाण्याचा प्रयत्न केला तरी पवार साहेबांनी त्याला भेट दिली नाही. आमचे नेते अशा प्रकरणात पाठराखण करणार नाहीत. आणि या प्रकरणात पाठीराखा असल्याशिवाय सुनील झंवर इतका मोठा घोटाळा करू शकणार नाही, अशा शब्दात माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी गिरीश महाजन यांचे नाव न घेता आज चौफेर टोलेबाजी केली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी आज राष्ट्रवादीची बैठक झाली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी बीएचआर प्रकरणावर भाष्य केले. ते म्हणाले की, या बँकेत सर्वसामान्यांच्या ठेवी बुडाल्या आहेत. यातील पैशांमधून अनेकांनी देशभरात मोठ्या मालमत्ता विकत घेतल्या. या प्रकरणाची चौकशी आधीच्या सरकारने दडपून ठेवली होती. मात्र महाविकास आघाडीने याला गती दिल्यामुळे सर्वसामान्यांच्या ठेवी मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
डॉ. पाटील यांना या प्रकरणात गिरीश महाजन यांनी बारामतीला जाऊन शरद पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, बारामतीला कोण गेले हे आपल्याला माहित नाही. मात्र त्यांना भेट मिळाली नाही. आमचे नेते या प्रकाराची पाठराखण करणार नाही.
सुनील झंवर हा माजी मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय असल्याबद्दल विचारणा केली असते ते म्हणाले की, कोण कुणाचा डावा की उजवा ? हे आपल्याला म्हणायचे नाही. मात्र कुणी पाठीराखा असल्याशिवाय सुनील झंवर इतका मोठा घोटाळा करू शकणार नाही. तर राष्ट्रवादीच्याच काही जणांनी कर्ज घेतल्याकडे लक्ष वेधले असते ते म्हणाले की, थकबाकीदार हा कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याच्यावर कारवाई व्हायलाच हवी.
खालील व्हिडीओत पहा डॉ. सतीश पाटील नेमके काय म्हणालेत ते ?
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/222938059196548