सर्व नियमांचे पालन करूनच कोर्टाच्या कामकाजास प्रारंभ : अ‍ॅड. केतन ढाके ( व्हिडीओ )

जळगाव सचिन गोसावी । सोमवारपासून जिल्हा व सत्र न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू झाले असून कोरोनाच्या प्रतिकारासाठीच्या सर्व नियमांचे पालन करूनच कामकाज सुरू झाले असल्याची माहिती विशेष सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली.

लॉकडाऊन नंतर पहिल्यांदाच राज्यातील सर्व न्यायालये हे आधीप्रमाणेच म्हणजेच सकाळी साडे दहा ते सायंकाळी सहा या कालावधीत सुरू झालेली आहेत. या अनुषंगाने जळगाव जिल्हा व सत्र न्यायालय देखील १ फेब्रुवारीपासून नियमितपणे सुरू झाले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, विशेष सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, २३ मार्च २०२० नंतर आता पहिल्यांदाच न्यायालय हे नियमितपणे सुरू झालेले आहे.

अ‍ॅड. केतन ढाके पुढे म्हणाले की, लॉकडाऊनच्या कालावधीत कोर्टाचे कामकाज हे फक्त एका सत्रात सुरू होते. आणि त्यात फक्त अति तातडीच्या खटल्यांचीच सुनावणी होत होती. त्यात देखील सर्वाधीक कामकाज हे जामीनांचेच होत होते. दरम्यान, मे २०२० नंतर कारागृहातील क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याने अनेक गंभीर गुन्ह्यातील आरोपींनाही जामीन मिळाला. तथापि, आता नियमितपणे कामकाज सुरू झालेले आहे.

दरम्यान, जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज हे आधीप्रमाणेच सुरू झाले असले तरी कोरोनाच्या प्रतिकारासाठी आवश्यक असणार्‍या सर्व नियमांचे येथे पालन होत असल्याचे अ‍ॅड. ढाके यांनी नमूद केले. ते म्हणाले की, न्यायालयात प्रवेश करतांना पक्षकार, वकील आणि कर्मचार्‍यांची नोंदणी होऊन त्यांचे हात सॅनिटाईज करून आणि त्यांनी मास्क घातला आहे की नाही ? हे तपासूनच मध्ये प्रवेश दिला जातो. यामुळे कुणीही पक्षकाराने न्यायालयात येतांना नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके यांनी केले आहे.

खालील व्हिडीओत पहा अ‍ॅड. केतन ढाके नेमके काय म्हणालेत ते ?

https://www.facebook.com/508992935887325/videos/452593889209999

Protected Content