डॉ. देवरामभाऊ नारखेडे काळाच्या पडद्याआड !

जळगाव प्रतिनिधी । ज्येष्ठ गांधिवादी, साहित्यीक व समाजसेवक देवरामभाऊ श्रीपत नारखेडे यांचे आज सकाळी अकस्मात निधन झाले. त्यांच्या माध्यमातून एक तपस्वी व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

देवरामभाऊ नारखेडे (वय ९९) हे मूळचे साळवा (ता. धरणगाव) येथील रहिवासी. त्यांचे एम. एस्सी. अ‍ॅग्रीकल्चर इतके शिक्षण झाले होते. गांधीवादी विचारांनी प्रेरीत होऊन त्यांनी अनेक सामाजिक कामांमध्ये हिरीरीने भाग घेतला. १९६० साली साळवा येथे एकाच वेळी आठ जणांच्या खुनाचे प्रकरण घडले. यात देवरामभाऊ यांचे नाव गोवण्यात आले. यात त्यांना फाशीची शिक्षा देखील झाली. मात्र निरपराध देवराम नारखेडे यांच्या बाजूने देश-विदेशातील मोठी मंडळी उभी राहिली. यात आचार्य विनोबा भावे, काकासाहेब गाडगीळ आदींसह अनेक मान्यवरांचा समावेश होता. यातून अखेर राष्ट्रपदींच्या स्वाक्षरीने त्यांनी मुक्तता झाली. या भीषण कालखंडानंतरचे आयुष्य त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांसाठी अर्पित केले.

देवरामभाऊ नारखेडे यांनी ८० व्या वर्षी पीएच.डी. संपादन केली. त्यांनी विपुल लिखाण केले असून यातील काही प्रकाशित तर बरेचसे अप्रकाशित आहे. अलीकडच्या काळात ते आपल्या नातवासोबत नाशिक येथे वास्तव्याला होते. आज सकाळी त्यांचे अकस्मात निधन झाले. त्यांच्या जाण्याचे एक तपस्वी व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना अर्पण होत असून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे.

डॉ. देवरामभाऊ यांच्या पार्थिवावर आजच नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Protected Content