उपमहापौर सुनील खडके जळगावकरांशी थेट संवाद साधणार

जळगाव प्रतिनिधी । जळगावकरांच्या समस्या जाणून घेत याचे निराकरण करण्यासाठी उपमहापौर सुनील खडके हे प्रभाग निहाय भेटी देणार आहेत.

उपमहापौर सुनील खडके यांनी नुकताच उपमहापौरपदाचा पदभार स्विकारला असून कामाला सुरूवात केली आहे. यात आता ते शहरातील नागरिकांना दैनंदिन भेडसावणार्‍या समस्या जाणून घेत त्या तातडीने सोडविण्यासाठी २३ नोव्हेंबरपासून दररोज प्रभाग निहाय दौरा करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत प्रभागातील चारही नगरसेवकांसह प्रभाग अधिकारी व अभियंते उपस्थित राहणार आहेत. नागरिकांशी संवाद साधणे तसेच तातडीने सोडवता येणार्‍या समस्यांना निपटारा करणे हाच प्रमुख उद्देश या दौर्‍यामागे असल्याचे उपमहापौरांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.

नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या अधिकार्‍यांच्या उपस्थित ऐकूण त्या सोडविण्यासाठी २३ नोव्हेंबर ते १८ डिसेंबरदरम्यान दररोज सकाळी ९ ते १०.३० यावेळेत पाहणी करण्यात येणार आहे. यात रस्त्यांची कामे तातडीने होणे शक्य नसले तरी खड्डे बुजविणे, पथदिवे सुरू करणे, साफसफाईची समस्या असल्यास आरोग्य विभागाच्या माध्यमातून तातडीने निपटारा करणे या मुलभूत समस्यांचा समावेश असणार आहे. नागरीकांनी देखिल दौर्‍यादरम्यान अथवा कार्यालयात उपमहापौरांकडे लेखी तक्रार द्यावी असे सांगण्यात आले.

दरम्यान, अमृत योजनेच्या कामांना गती देण्यासाठी मक्तेदाराच्या प्रतिनिधींना देखिल दौर्‍यात सहभागी करून घेण्यात आले आहे.

Protected Content