जळगाव प्रतिनिधी । येथील एस.टी. महामंडळाच्या आगारात ड्युटी लावण्याच्या वादातून वाहतूक निरिक्षकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर याचा आरोप असणार्यांनी निरिक्षकावर जातीवाचक शिवीगाळ केल्याची क्रॉस कंप्लेंट केल्याने हा वाद चिघळल्याचे दिसून येत आहे.
एस.टी महामंडळाच्या जळगाव आगारातील चालक, वाहकांच्या ड्युटीवरुन कास्ट्राइब कर्मचारी संघटनेचे विभागीय सचिव शैलेश नन्नवरे यांनी वाहतूक निरीक्षक मनोज तिवारी यांना मारहाण केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर तिवारी यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप नन्नवरे यांनी केला आहे.
हा वाद दोन दिवसांपासून सुरू होता. रविवारी दुपारी काळे नावाच्या एका कर्मचार्यास ड्युटी मिळाली नाही म्हणून नन्नवरे यांनी वाहतूक निरीक्षक तिवारी यांना विनंती करुन स्पेअरमध्ये अॅडजस्ट करण्याची विनंती केली. परंतु, तिवारी यांनी नकार दिला. याच विषयांवरून दोघांमध्ये शाब्दीक चकमक उडाली होती. दरम्याम, सोमवारी दुपारी नन्नवरे यांनी पुन्हा तिवारींच्या कॅबीनमध्ये जाऊन त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. अशा आशयाची फिर्याद तिवारी यांनी जिल्हापेठ पोलिसात दिली. नन्नवरे यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तिवारी यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप नन्नवरे यांनी करत तक्रार दाखल केली आहे. यामुळे एस.टी. महामंडळातील धुम्मस पुन्हा एकदा समोर आली आहे.